जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी सोन्यात घट तर चांदीत दरवाढ नोंदवली गेली होती. मात्र, गुरूवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दराने अचानक उसळी घेतली. ऐन लग्नसराईत झालेली मोठी उलथापालथ लक्षात घेता ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली.
अमेरिकन कायदेकर्त्यांनी तात्पुरत्या खर्चाच्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ४३ दिवसांचा बंद संपला असून, डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही गुरूवारी सकाळी सोन्याचा भाव ४,२१२.७४ डॉलरवर गेला.
गुरुवारी देशांतर्गत वायदा बाजार, एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) मध्येही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली. लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी वाढत असताना देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती थांबण्याचे नाव घेत नसून, ग्राहकांना आर्थिक कुवतीनुसार दोन्ही धातू खरेदी करणे कठीण होत आहे.
सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, लग्नसराईच्या हंगामात गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांकडूनही खरेदी वाढली आहे. या वाढत्या मागणीमुळे दोन्ही धातुंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत आहेत, ज्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होत आहे. आंतरराष्ट्रीय डॉलर निर्देशांकातील चढ-उतार आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळेही गुंतवणूकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याकडे वळत आहेत. परिणामी, भारतातील प्रमुख शहरांमध्ये तसेच जळगावसारख्या संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमती वाढत चालल्या आहेत.
जळगाव शहरात मंगळवारी १७५१ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याच्या दराने तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २८ हजार ०२९ रूपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बुधवारी दिवसभरात ३०९ रूपयांची किंचित घट नोंदवली गेल्याने सोने तीन टक्के जीएसटीसह एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत खाली आले होते. परंतु, गुरूवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल २३६९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३० हजार ०८९ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदीत तब्बल ९२७० रूपयांनी वाढ
शहरात मंगळवारी ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६१ हजार ७१० रूपयांपर्यंत गेले होते. बुधवारी दिवसभरात पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत पोहोचले. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच तब्बल ९२७० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह एक लाख ७२ हजार रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
