जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत तीन दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दराने सर्वकालीन उच्चांक केला होता. त्यानंतर दोन्ही धातुंच्या दरात फार चढ-उतार दिसून आले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसातील उलथापालथ लक्षात घेता सोने चांदीच्या दराची अनिश्चितता कायम आहे. ग्राहकांसह व्यावसायिकांनी त्याची धास्ती मोठी घेतली आहे.

आगामी यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे गुंतवणुकदारांचे डोळे लागले आहेत. अमेरिकेतील कामगार बाजारातील कमकुवत आकडेवारीमुळे व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या असून, याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते. त्यामुळे डॉलर आणि व्याजदरांमधील हालचालींवर त्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. सध्या या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

मात्र, भारतात परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत आणखी चांगली वाढ दिसून येते. नवरात्र, करवा चौथ, दिवाळी यांसारख्या मोठ्या सणांमध्येही सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यानंतर लग्नसराईचा हंगामही सुरू होतो, ज्यामुळे दागिन्यांची मागणी वाढत जाते. याच कारणामुळे भारतातील दागिन्यांच्या बाजारात सोन्याच्या खरेदीला पुढील काळात जोर येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सोन्याच्या किमतींमध्ये जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी, सण-उत्सव आणि लग्नांच्या हंगामात मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या किमतींमध्ये जागतिक पातळीवर संमिश्र कल दिसून आला. व्याजदरांबाबतची अनिश्चितता आणि डॉलर इंडेक्समधील हालचाली यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे वातावरण कायम असल्याचे दिसून आले. तज्ज्ञांच्या मते, यूएस फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीपूर्वी बाजारात सावधगिरीचा सूर दिसत आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेतील कामगार बाजाराची कमकुवत आकडेवारी व्याजदर कपातीची शक्यता वाढवत आहे. व्याजदर कमी झाले तर डॉलर कमजोर होतो आणि त्यामुळे सोन्याला बळ मिळते. मात्र, सध्याच्या पातळीवर गुंतवणूकदार थोडा थांबण्याच्या भूमिकेत असल्याने किंमतीत चढ-उतार सुरू आहेत. जळगावमध्ये गेल्या शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार ८१५ रूपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात कोणतीच वाढ नोंदवली गेली नाही. मात्र, सोमवारी बाजार उघडताच २०६ रूपयांनी घट झाली. त्यामुळे सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार ६०९ रूपये नोंदविला गेला.

चांदीचे दर स्थिर

जळगावात गेल्या शुक्रवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३३ हजार ९०० रूपयांपर्यंत पोहोचले होते. नंतरच्या तीन दिवसात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी चांदीचे दर प्रति किलो एक लाख ३३ हजार ९०० रूपयांपर्यंत स्थिर राहिले.