जळगाव : जिल्ह्यात जैव विविधतेच्या संवर्धनासह स्थानिकांना रोजगार आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे अडीच कोटी रूपये निधीतून नुकताच पूर्ण करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अडीच हजाराची दोन तिकीटे खरेदी करून शनिवारी तब्बल दीड तास या जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला.

सातपुडा जंगल सफारी, हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल परिसराला नवा चेहरा त्यामुळे मिळणार आहे. तरुणांनी येथे छोटे-मोठे हॉटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबाने एकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले. शासनाच्या निधीतून प्रारंभी फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारासह अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, १८ प्रशिक्षित गाईड आणि चालकांची नियुक्ती यांचा त्यात समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे पालकमंत्री पाटील म्हणाले.

सातपुडा जंगल सफारीसाठी एका गाडीचे तिकीट अडीच हजार रुपये आहे. पालकमंत्री पाटील यांनी पाच हजार रुपये देऊन दोन गाड्यांची तिकीटे खरेदी केली. या अर्थाने ते जंगल सफारीचे पहिले पर्यटक ठरले. त्यांच्यासोबत रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वन विभागाचे इतर अधिकारी सहभागी झाले होते. सफारीदरम्यान पालकमंत्र्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती जाणून घेतली. निसर्ग जतन करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. या परिसरात ‘डार्क स्काय पार्क’ची उभारणी व्हावी, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनीही व्यक्त केली. सूत्रसंचालन वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांनी केले. उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी प्रास्ताविकात जंगल सफारीची सविस्तर माहिती दिली.

सातपुड्यातील पाल अभयारण्यात पर्यटकांसाठी अनेक निसर्ग संपन्न ठिकाणे आहेत. डोंगराच्या उंचावरून तलावाचे मोहक दृश्य पाहतानाच पक्षी निरीक्षणही करता येते. इको हट पॉईंट हे पर्यावरणपूरक विश्रांती स्थान असून, बांबू आणि स्थानिक नैसर्गिक साहित्य वापरून बांधलेल्या झोपड्यांमध्ये निवांत बसण्याची सोय आहे. याशिवाय, सनसेट पॉईंट हे सायंकाळच्या वेळेस अप्रतिम सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचावरून दिसणारा डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि मावळणारा सूर्य यांचे दृश्य मनाला मोहवणारे असते. छायाचित्रकारांना हे ठिकाण भुरळ पाडते. याशिवाय, वाघडोह परिसर जंगल सफारीतील सर्वात रोमांचक भाग मानला जातो. तिथे वाघासह बिबट्या आणि विविध वन्य जीवांचा अधिवास आहे. वन विभागाच्या मार्गदर्शकांसह सर्व ठिकाणे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.