जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराचा शोध सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. जळगाव ग्रामीणमधील धरणगावातही शिवसेनेने (उद्धव ठाकरे) संभाव्य उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित केले होते. मात्र, मतदार यादी तपासल्यावर त्याच उमेदवाराचे नाव नेमके गायब झाल्याचे लक्षात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायती ताब्यात घेण्यासाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या तुलनेत महाविकास आघाडीची वाटचाल थोडी संथ वाटत असली, तरी प्रत्येक पक्ष आपापल्या बाजुने संभाव्य उमेदवारांची चाचपणी करताना दिसत आहे. जळगाव ग्रामीणमधील धरणगावातही नगरपरिषदेच्या निवडणुकीची लगबग सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. मात्र, त्या ठिकाणी निवडणूक प्रचाराचे ढोल वाजण्याआधीच राजकारणात मोठा भूकंप निर्माण झाला आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे मतदार यादीतील घोळ. या घोळामुळे सध्या धरणगाव शहराचे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, या यादीतून शिवसेनेच्या (ठाकरे गट) सर्वाधिक चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवाराचेच नावच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
धरणगावच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून त्या जागेसाठी सक्षम महिलांचा शोध घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी पक्षाचे उपनेते तथा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मातोश्री रुखमाबाई रतन वाघ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना अधिकृत उमेदवार मानले होते. त्यांच्या कामकाजाचा आणि सामाजिक सहभागाचा विचार करता, त्या ठाकरे गटाच्या दृष्टीने मजबूत आणि लोकप्रिय उमेदवार ठरल्या असत्या. मात्र, अंतिम मतदार यादी जाहीर होताच सर्वांना मोठा धक्का बसला. कारण रुखमाबाई वाघ यांचे नावच मतदार यादीतून गायब झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच ठाकरे गटात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी ठाकरे गटाने तातडीने धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पक्षाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, हा प्रकार सत्ताधाऱ्यांचा सुनियोजित डाव असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी आता केला आहे. आपल्या आईसह बहिणीचे नाव मतदारयादीतून वगळण्यासाठी विरोधकांनी १० ते १२ लाख रुपये खर्च करून कटकारस्थान रचले आहे. निवडणूक एकतर्फी करण्यासाठी हा घाट घातला गेला आहे. केवळ आपल्या कुटुंबियांचेच नाही तर असंख्य ठाकरे गट समर्थकांची नावेही यादीतून गायब केली गेल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे.
