नाशिक : शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून रात्री नाशिकरोडच्या कदम लॉन्स भागात बिबट्याच्या हल्ल्यात पादचारी गंभीर जखमी झाला. वन विभागाने रात्रभर शोध मोहीम राबवूनही बिबट्याचा छडा लागला नाही. त्यामुळे आनंदनगर व आसपासच्या परिसरातील रहिवाश्यांना एकटे घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेतला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवळाली कॅम्प व नाशिकरोड भागात अधुनमधून बिबट्याचे दर्शन घडत असते. तोफखाना केंद्र अर्थात लष्करी क्षेत्रालगतचा हा भाग आहे. लष्कराच्या शेकडो एकर जागेत जंगल आहे. तिथून बिबटे आसपासच्या नागरी वस्तांमध्ये शिरल्याची उदाहरणे आहेत. आनंदनगर भागात पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली. रविवारी पहाटे कॉलनी परिसरातून बिबट्याची भ्रमंती सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती. रात्री कदम लॉन्स भागात बिबट्याने पायी जाणाऱ्या राजू शेख (भालेकर मळा) यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. नागरीक व पोलिसांनी जखमी शेख यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर परिसरात शोध मोहीम राबविली गेली. पण, त्याचा छडा लागला नाही, असे वन विभागाच्या अधिकारी वृषाली गाडे यांनी सांगितले.

हेही वाचा… गुप्तधनाची लालसा, बालकाला अमावस्येच्या दिवशी पळवले; मालेगावातील नरबळीची घटना उघड

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सुकी नदीत तरुण बेपत्ता

नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

बिबट्या याच भागात दडलेला असू शकतो. त्यामुळे पथकांनी सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सतर्क केले. एकटे घराबाहेर पडू नका, बाहेर फिरताना हातात काठी ठेवा असे आवाहन करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरी वस्तीत पिंजरा लावता येत नाही. लष्करी क्षेत्रात तो लावता येईल का, याची पडताळणी केली जात आहे. सोमवारी दिवसभर वन विभागाचे पथक तैनात राहणार असल्याचे गाडे यांनी म्हटले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. शहरात यापूर्वी अनेकदा बिबट्याने नागरी भागात प्रवेश केलेला आहे. त्याच्या हल्ल्यात, त्याला जेरबंद करताना अनेक जण जखमीही झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करताना बघ्यांची गर्दी वन विभाग व पोलिसांसाठी अडथळा ठरते. किमान या शोध मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा यंत्रणा बाळगून आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard again sited in nashik city one injured in the attack forest department on alert mode asj