नाशिक -मध्य प्रदेशातील उज्जेैन येथे २०२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याआधी २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.  उज्जैन आणि नाशिक या दोन्ही ठिकाणच्या कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेश सरकारने कुंभमेळ्यास अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी असतानाही नियोजनाच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असल्याने त्यासाठी कामे सुरु आहेत. निधी जमवाजमव, भूसंपादन अशा काही कामांना अजूनही वेग आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळाने  नाशिक येथे भेट दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनाची तसेच सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. 

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे २०२८ मध्ये कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय दुबे, उज्जैनचे विभागीय आयुक्त आाशिष सिंह, उज्जैनचे जिल्हाधिकारी रोशनकुमार सिंह, उज्जैन महानगरपालिकेचे आयुक्त अभिलाष मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा नियोजनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात ही भेट झाली.

यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आदी उपस्थित होते. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी कुंभमेळा आयोजनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समिती आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या रचनेबरोबरच नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

त्यात रस्ते, घाटांचा विस्तार, मलनि:स्सारण प्रकल्प, रामकाल पथ, त्र्यंबकेश्वर उपसा सिंचन योजना, वाहनतळ, रेल्वे, विमान, रस्ते वाहतुकीची सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालये, साधूग्राम, सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त, गर्दी नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली.  नाशिक महानगरपालिका आयुक्त  मनिषा खत्री यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. याबरोबरच उज्जैनच्या शिष्टमंडळातर्फे अपर मुख्य सचिव दुबे, जिल्हाधिकारी सिंह यांनी उज्जैन कुंभमेळा नियोजनाची सविस्तर माहिती देत उज्जैन येथे भेट देण्याचे निमंत्रण आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर या पथकाने तपोवन, मल नि:स्सारण प्रकल्प, रामकुंड परिसरास भेट देऊन पाहणी केली.