नाशिक – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय नेत्यांशी संबंधित गणेश मंडळांकडून उज्जैनचे महाकालेश्वर, तिरुपती बालाजी व जगन्नाथपुरी, गुवाहाटी येथील कामाख्या देवी, वृंदावनचे प्रेम मंदिर… अशा देशभरातील विविध मंदिरांच्या भव्य-दिव्य प्रतिकृती साकारत मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरू आहे. कुंभनगरी नाशिक आधीपासून मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. गणेशोत्सवातून मतांचे समीकरण जुळवण्याकडे माजी नगरसेवक आणि इच्छुकांचा कल दिसतो. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्याचे प्रत्यंतर भाजपप्रणीत मंडळांच्या वाढत्या संख्येतून येत आहे.
शहरात गणेशोत्सव अतिशय धामधुमीत साजरा होत असून देखावे, सजावट पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. महापालिकेची रखडलेली निवडणूक २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार लवकरच होणार आहे. ३१ प्रभागात १२२ सदस्य असतील. या सर्व प्रभागात सर्वपक्षीय इच्छुकांच्या गणेश मंडळांचा प्रभाव दिसून येतो. महापालिका निवडणुकीमुळे यंदा गणेश मंडळांच्या संख्येत गतवेळच्या तुलनेत दुपटीने वाढ होऊन ती ७०० हून अधिकवर पोहोचली.
गणेशोत्सवात राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांनी देखावे, सजावट व वेगवेगळे उपक्रम यात् कुठलीही कसर ठेवलेली नाही. शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या जुने सिडकोतील राजे छत्रपती मित्र मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. याकरिता खास उत्तर प्रदेशहून ३० हून अधिक कारागिराना बोलाविण्यात आले होते. महिनाभर हे काम चालले. ६१ फूट उंच, ३० फूट रुंद आणि ५० फूट लांब या महाकालेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीत गोल घुमट व ७१ फूट उंच शिखर संपूर्ण रचनेला भव्यतेची अनुभूती देते. उज्जैन महाकाल मंदिराप्रमाणे सर्व नित्य पूजा व आरतीचे नियोजन करीत भाविकांना आकर्षित केले जात आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार वसंत गिेते संस्थापक असणाऱ्या मुंबई नाका मित्र मंडळाने ६५ व्या वर्षात पर्दापण केले आहे. प्रारंभी या मंडळाचे नाव तरूण शेतकरी मित्र मंडळ होते. नंतर ते मुंबई नाका मित्र मंडळात परावर्तीत झाले. मुंबईहून शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गातील प्रमुख चौकात अतिशय सुबक देखावे साकारण्याचा मंडळाचा नावलौकिक आहे. या वर्षी मंडळाने तिरुपती बालाजी आणि जगन्नाथपुरी मंदिराची एकत्रित सजावट केलेली आहे. मागील वर्षी म्हैसूर पॅलेसचा देखावा साकारला होते. मंडळाची सजावट पाहण्यासाठी केवळ प्रभागातील नव्हे तर, संपूर्ण नाशिकमधून नागरिक खास मुंबई नाका येथे येतात, असे मंडळाचे अध्यक्ष किरण मोटकरी आवर्जुन सांगतात.
भाजपचे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे संस्थापक असणाऱ्या भाजपप्रणीत श्री प्रतिष्ठान मंडळाने इंतिरानगर येथे वृंदावन येथील प्रेम मंदिराचा देखावा साकारला आहे. ८० फूट उंच आणि ६० फूट रुंद अशी मंदिराची भव्य प्रतिकृती आहे. अनेक भाविकांना मथुरेला जाता येत नाही. ते या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त करीत असल्याचे पदाधिकारी सांगतात.
इंदिरानगर येथील बापू बंगल्यासमोर भाजपप्रणीत इंदिरानगर उत्सव समितीने आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. माजी नगरसेवक सुनील खाडे हे या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राजू लवटे यांच्याशी संबंधित नाशिकरोड येथील अनुराधा फ्रेंड्स सर्कल व जय बजरंग मित्र मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. जय भवानी रस्त्यावरील राधेकृष्ण फाऊंडेशन आणि आयएसपी, सीनएनपी वेल्फेअर फाऊंडेशन या अराजकीय मंडळांनी भव्य मंदिरांची उभारणी केली.
सजावटीवर होऊ द्या खर्च….
सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांशी संबंधित मंडळांनी सजावटीवर मोठा खर्च केला आहे. तुलनेत विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या काही निवडक मंडळांचा अपवाद वगळता बहुतेकांनी तितका खर्च केला नसल्याचे दिसून येते. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक विनायक पांडे यांच्या शिवसेवा मित्र मंडळाने संगीतावर आधारीत रोषणाईची परंपरा कायम ठेवली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्या दंडे हनुमान मित्र मंडळाने फुलांच्या महिरफीत गणरायाला स्थानापन्न केले. तर शहर काँग्रेसतर्फे महात्मा गांधी रस्त्यावरील मंडपात सजावट केलेली नाही.