नाशिक – महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आणि संस्था, संघटनांच्या अपेक्षा या विषयावर चर्चासत्रात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. चेंबरचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचा नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबर गाव तिथे उद्योजक हे अभियान राबविणार असल्याची घोषणा अध्यक्ष माणगावे यांनी केली आहे.
महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागतर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर चेबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनिष रावल, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, चेंबरचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, विक्रम सारडा, संतोष मंडलेचा उपस्थित होते.
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळाच्या यशस्विततेसाठी राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारकडे पायाभूत सोयी सुविधा व इतर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. दिवाळीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सर्व संघटनांची बैठक घेतली जाईल, असे अध्यक्ष माणगावे यांनी सांगितले. खा. राजाभाऊ वाजे यांनीही कुंभमेळ्याची कामे लवकरात लवकर होण्यासाठी आपल्यासोबत चेंबरनेही पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
महाराष्ट्र चेंबरच्या कृषी ग्राम विकास समितीतर्फे राजाराम सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागातील जे युवक उद्योगात येऊ इच्छितात, त्यांना चेंबरच्या माध्यमातून स्वयंरोजगार आणि उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. स्थानिक पातळीवरील सरपंच व इतर लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत एक समिती स्थापन केली जाईल. राज्यभर दौरे केले जातील. गाव तेथे उद्योजक हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यात एकूण ३६ हजारच्या आसपास गावे आहेत. या अभियानाच्या माध्यमातून या गावांमध्ये ३६ हजार उद्योजक हे घडविण्याचा मानस चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी व्यक्त केला. नाशिकचा विचार करता जिल्ह्यात १५ तालुके व १९३० गावे आहेत. या प्रत्येक गावांमधून तरुणांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर अर्थ व उद्योग साक्षरता उपक्रम सुरू करणार आहे.
स्वागत संयोजक वेदांशु पाटील तर प्रास्ताविक उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले. याप्रसंगी माजी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शंकर शिंदे, उपाध्यक्ष संगीता पाटील, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य आदी उपस्थित होते.