राज्य पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. नाशिक लाचलुचपत विभागाने केलेल्या एका कारवाईत तेजस गर्गेंचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर राज्य सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. नाशिकमधल्या बांधकाम व्यावसायिकाला पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक मृणाल आळे यांनी दीड लाखांची लाच घेऊन ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. या प्रकरणात तेजस गर्गेंनी ७५ हजारांचा वाटा असल्याचं मान्य केलं. त्यानंतर ते फरार आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मात्र संचालक पदावरुन त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

संजय केळकर यांची मागणी काय?

या प्रकरणी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा ठाण्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रारर करुन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी विभागीय चौकशीत तेजस मदन गर्गेंचा सहभाग आहे ही बाब समोर आली. या प्रकरणी तेजस गर्गेंना निलंबित करण्यात आलं आहे. तेजस गर्गे अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.नाशिक पेठ रोड भागात रामशेज किल्ल्यानजीक नवीन कंपनी सुरु करण्यासाठी नाशिक पुरातत्व विभागाने दीड लाख रुपये घेऊन ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं.

हे पण वाचा- तेजस गर्गेच्या मुंबईतील घराची तपासणी

काय आहे हे प्रकरण?

मे महिन्यात पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती अळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. मात्र त्या प्रसूती रजेवर असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर तेजस गर्गेंना फोन लावला. या फोनवर तेजस गर्गेंनी दीड लाखाच्या लाचेत अर्धा वाटा असल्याचं मान्य केलं. रामशेज किल्ल्याजवळ कारखाना सुरु करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली. यानंतर तेजस गर्गे फरार आहेत. जे अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. तेजस गर्गे ९ मे पासून फरार आहेत. त्यांना सुरुवातीला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. आता मात्र त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १२ जून रोजी तेजस गर्गेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने तेजस गर्गेंना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

आत्तापर्यंतची कारवाई काय?

एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेजस गर्गे यांचं मुंबई येथील निवासस्थान सील केलं आहे.

तेजस गर्गेंच्या पत्नीसमोर या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरात ३ लाख १८ हजारांची रोख रक्कम त्यांच्या घरात सापडली

याच झडतीत २ टीबी आणि १ टीबी चे हार्ड डिस्कही जप्त करण्यात आले आहेत. तसंच पासपोर्टही जप्त करण्यात आले आहेत.

तेजस गर्गे हे अद्यापही फरार आहेत ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागलेले नाहीत.

या प्रकरणात सहाय्यक संचालक आरती आळे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं आहे?

“मी तेजस गर्गेंच्या निलंबनाच्या फाईलवर सही केली आहे. हा निर्णय १६ मे पासूनच लागू करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्या विभागाकडून हा निर्णय झाला आहे. तसंच तेजस गर्गेंची खातेनिहाय चौकशीही केली जाणार आहे. एवढंच नाही तर त्यांना संचालकपदी नेमल्यापासून त्यांनी जे निर्णय घेतले त्याचीही चौकशी केली जाईल” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

कोण आहेत तेजस गर्गे?

तेजस गर्गे हे राज्य पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. त्याआधी ते केंद्रीय पुरातत्व खात्यातले अधिकारी म्हणू काम करत होते. तेजस गर्गे हे मूळचे नाशिकचे आहेत. त्यांचे वडील मदन गर्गे हे जगप्रसिद्ध शिल्पकार होते. त्यांच्या आई अरुणा गर्गे याही शिल्पकार आहेत. गर्गे आर्ट स्टुडिओला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. नाशिकमधल्या प्रतिथयश लोकांमध्ये गर्गे यांचा समावेश होतो.