मालेगाव : बदनामीची धमकी देत परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद (३१) या परिचारकाला येथील छावणी पोलिसांनी अटक केली. येथील एका नामांकित रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला.
नाशिकच्या एका संस्थेत परिचारिका अर्थात नर्सिंगचे शिक्षण घेणारी १६ वर्षीय पीडित विद्यार्थिनी येथील स्टेट बँक परिसरातील एका नामांकित रुग्णालयात कामाचा अनुभव म्हणून १९ जूनपासून कार्यरत होती. रात्रपाळीत कामावर असताना १३ जुलैच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास याच रुग्णालयात तिच्याबरोबर कामास असलेला परिचारक मोहम्मद अथरने तिला रुग्णालयाच्या मागील बाजूच्या उद्वाहिकेजवळ (लिफ्ट) बोलावले. तेथे त्याच्या भ्रमणध्वनीमध्ये असलेले तिचे छायाचित्र दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. नंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेने घडलेला प्रकार रुग्णालयात तिच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या मैत्रिणीला सांगितला. तसेच तिच्या आत्यालाही भ्रमणध्वनीवरून कळविण्यात आले. त्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयित मोहंमद यास अटक केली. न्यायालयात उभे केले असता त्यास १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उपनिरीक्षक सचिन चौधरी हे अधिक तपास करीत आहेत.