मालेगाव : समाजवादी पार्टी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शहरातील अमन चौकात शनिवारी रात्री जोरदार राडा झाला आहे. दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या व लोखंडी नळ्यांनी परस्परांवर हल्ला चढवल्याने सहा जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर येथील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींनुसार याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

मध्यंतरी मालेगावात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्याला अटक झाली होती. या प्रकाराच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यादरम्यान समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने काँग्रेस नेत्याच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद आणखी चिघळला. काँग्रेसच्या संबंधित नेत्याने त्यानंतर समाजवादी पार्टीच्या महिला नेत्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्याने या टिप्पणीबद्दल माफी मागावी अन्यथा ‘गोबर’ फेकण्याचा इशारा दिला होता. उभयपक्षीय हा शाब्दिक वाद हातघाईवर येईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून दिसत होती. शनिवारी रात्री त्याचेच प्रत्यंतर आले.

समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते मोहम्मद सलीम यांच्या तक्रारीनुसार काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग,राजू बेग यांच्यासह दहा जणांविरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन चौकातील मशिदीतून नमाज पठण करुन बाहेर पडल्यावर एजाज बेग यांच्या कार्यालयाजवळ कुरापत काढून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला चढविण्यात आल्याचे सलीम यांनी दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे. या हल्ल्यात समाजवादी पार्टीचे चार जण जखमी झाले आहेत. जखमी कार्यकर्त्यांना आधी येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर खाजगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. यातील दोघे गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसचे एजाज बेग यांनी देखील समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे बेग यांनी म्हटले आहे. या तक्रारीनुसार आझाद नगर पोलीस ठाण्यात समाजवादी पार्टीच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पक्षांमधील राड्यानंतर अमन चौक भागात एकच पळापळ झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांच्या दृष्टीने नेहमीच चिंतेचा बनलेला असतो. येत्या काळात मालेगाव महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शहरातील मुस्लिम बहुल भागात एमआयएम,इस्लाम पार्टी,समाजवादी पार्टी, काँग्रेस या पक्षांमध्ये चुरस होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर दोन पक्षांमध्ये निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राडा झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.