मालेगाव : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील सरपंचाने दोन वेगवेगळ्या धनादेशांवर ग्रामसेवकाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून विहीर योजनेची लाभार्थी महिला व ग्रामरोजगार सेवक या दोघांना एक लाख ३२ हजाराचे पेमेंट अदा केल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द ग्रामसेवकानेच यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे.

विराणे ग्रामपंचायतीत नंदकुमार सोनवणे हे सरपंच असून सुरतीराम शिरोळे हे ग्रामसेवक आहेत. १९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत आपण वैद्यकीय रजेवर असताना बनावट स्वाक्षरीने धनादेश अदा करण्याचा हा प्रकार घडल्याचे ग्रामसेवक शिरोळे यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ( एमआरईजीएस) पेमेंट अदा करण्यासाठी धनादेशावर सरपंच व ग्रामसेवक या दोघांच्या सह्या आवश्यक असतात. या प्रकरणात मात्र सरपंच सोनवणे यांनी दोन धनादेशांवर आपली बनावट स्वाक्षरी केली,असे ग्रामसेवकाचे म्हणणे आहे.

शिरोळे यांच्या तक्रारीनुसार, सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी ग्रामपंचायतमधील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (एमआरईजीएस) योजनेचे दप्तर चोरी करून नेले. तसेच या योजनेतील विहीर घटकाची लाभार्थी असलेल्या महिलेचे अनुदान देण्यासाठी तयार केलेल्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करून एक लाख दोन हजार आणि ग्रामरोजगार सेवक नंदू पगार यांचे मानधन देण्यासाठीच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी करुन ३० हजार रुपये पेमेंट अदा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय रजा संपल्यानंतर वडनेर येथील महाराष्ट्र बँकेतील ग्रामपंचायतीच्या संबंधित खात्याची पडताळणी केल्यावर फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी सरपंच सोनवणे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपल्याशी वाद घालून शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली, असेही शिरोळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार सरपंच सोनवणे यांच्या विरोधात वडनेर खाकुडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.बी.नवले हे अधिक तपास करीत आहेत.

सरपंचाकडून इन्कार…

दरम्यान, या तक्रारीचा सरपंच नंदकुमार सोनवणे यांनी इन्कार केला आहे. रोजगार हमी योजनेचे अनुदान बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतीला प्राप्त झाले होते. संबंधित महिला लाभार्थी त्यासाठी सारखा तगादा लावत होती. ग्रामरोजगार सेवकाचे मानधनही रखडले होते. हे पेमेंट देणे सरपंच व ग्रामसेवक या दोघांची जबाबदारी असते. त्यानुसार दोघांच्या स्वाक्षरीनेच हे धनादेश देण्यात आले. संबंधित रक्कम देखील त्या दोघांच्या बँक खात्यातच वर्ग झाली आहे. त्यासाठी मला खोटी स्वाक्षरी करण्याची गरज काय, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.