नाशिक – जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये “माझी शाळा – माझा अभिमान” हे आगळेवेगळे अभियान राबविण्यात येणार असून, हा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून साकारला आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त बहुतांश नोकरदार वर्ग हा गावाकडे येतो, गावाकडे आल्यानंतर या माजी विद्यार्थांना जिल्हा परिषद शाळेतील आठवणींना उजाळा मिळावा व शाळांबद्दल अभिमानाची भावना वाटावा आणि माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेशी पुन्हा घ्यावे या अनुषंगाने २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाची कल्पना अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेचे स्थान हे केवळ शिक्षण देणारे नसून आयुष्य घडविणारे असते. शाळेच्या आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, मैत्रीचे क्षण, पहिल्या बक्षिसाची आनंदाची झेप — या साऱ्या आठवणी आयुष्यभर हृदयात घर करून राहतात. अशा या जीवनाला दिशा देणाऱ्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी हातभार लावावा यासाठी “माझी शाळा – माझा अभिमान” हा उपक्रम सुरु होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी सांगितले की, “आपल्याला घडविणाऱ्या शाळेला काहीतरी परत द्यायची भावना प्रत्येकाच्या मनात असते. या उपक्रमाद्वारे ती भावना कृतीत उतरविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शाळा हा गावाचा आत्मा आहे, आणि गावाच्या विकासाचा पाया शिक्षणातच आहे. त्यामुळे ‘गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा’ हा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे.
अभियानाच्या कालावधीत सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, शाळेच्या भिंतींचे रंगरंगोटीकरण, स्वच्छता अभियान, ग्रंथदान, क्रीडा साहित्य किंवा शिक्षणोपयोगी वस्तूंचे योगदान, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यामुळे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या एकत्र सहभागातून शाळांमध्ये विकास आणि सौंदर्यवृद्धीचा एक उत्सव साजरा होणार आहे.
“माझी शाळा – माझा अभिमान” हे अभियान म्हणजे केवळ शाळेच्या विकासासाठीचा उपक्रम नसून, आपल्या बालपणाच्या आणि शिक्षणाच्या आठवणींना पुन्हा जिवंत करणारा एक भावनिक सोहळा आहे. या माध्यमातून प्रत्येक माजी विद्यार्थी आपल्या शाळेशी पुन्हा जोडला जाईल आणि “माझी शाळा” हा शब्द अभिमानाने उच्चारताना आपल्या गावाच्या शिक्षणप्रेमाची साक्ष देईल.
नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्व गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना या उपक्रमाचे समन्वयन करण्याच्या सूचना दिल्या असून, या अभियानातून जिल्ह्यातील शाळांमध्ये नवचैतन्य फुंकले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली.
