जळगाव : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर अलिकडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यासंदर्भात रूपाली चाकणकर यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करतानाच खेवलकर यांचे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि तो देशातील सर्वात मोठा विषय होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आता केले आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी घटनास्थळी दोन महिला उपस्थित होत्या. तपासादरम्यान खेवलकर यांच्या घरातून जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमध्ये महिलांसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट, नग्न आणि अर्धनग्न छायाचित्रे व काही अशोभनीय कृत्यांच्या चित्रफिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अनेक धक्कादायक आरोप करून वातावरण अधिकच तापवले आहे. त्यांनी या प्रकरणात महिलांचा गैरवापर, संशयास्पद संपर्क आणि इतर गंभीर बाबींचा उल्लेख करत कठोर कारवाईची मागणीही केली. संशयित प्रांजल खेवलकर यांच्यावरील आरोपांच्या आधारे रोहिणी खडसे यांच्यावरही चाकणकरांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आणि प्रांजल खेवलकर यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी जावयाची बाजू घेत चाकणकरांवर पलटवार केला. मात्र, चाकणकरांविषयी बोलताना खडसेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप करून भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून त्यांच्या व्यंगचित्राला जळगावमध्ये शाई फासली. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांकडून जी काही माहिती मिळाली तीच रूपाली चाकणकर यांनी वाचून दाखवली, असे सांगून मंत्री महाजन यांनी आता त्यांची पाठराखण केली आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून योग्य दिशेने सुरू आहे. थोड्याच दिवसात खरे काय खोटे काय सर्व बाहेर येईल. त्यामुळे त्या विषयावर आपण न बोललेले बरे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री महाजन यांनी दिली.

हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून जळगाव जिल्ह्याचे राजकारण तापले असताना मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्धाने विखारी वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील लोकप्रतिनिधींचे विकासाकडे लक्ष कमी आणि दुसऱ्या गोष्टींकडे जास्त असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच व्यक्त केली. सध्या जळगावमध्ये जे काही सुरू आहे, ते कुठेतरी थांबले पाहिजे. त्याविषयी मनाला खूप वेदना होतात, असेही रक्षा खडसे म्हणाल्या होत्या. प्रत्यक्षात, दोन्ही नेते कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने त्यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढण्याची चिन्हे दिसून आली आहेत.