नाशिक : मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनापासून जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा खासदार व आमदारांनी अंतर राखल्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी घाईघाईत आपली भूमिका मांडली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिंडोरीतील खासदार भास्कर भगरे यांनी मुंबईत आंदोलनस्थळी जरांगे यांची भेट घेतली. सत्ताधारी महायुतीचे जिल्ह्यात १४ आमदार आहेत. यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देवळालीतील आमदार सरोज अहिरे वगळता कोणी मराठा लोकप्रतिनिधी आंदोलनावर भूमिका मांडण्यास पुढे आला नसल्याचे चित्र समोर आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनापासून जिल्ह्यातील मराठा लोकप्रतिनिधींचे अंतर राखल्याने सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तीव्र शब्दांत नाराजी प्रगट केली होती. जिल्ह्यात १५ पैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार आहेत. यात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे, नाशिक पूर्वचे राहुल ढिकले, निफाडचे दिलीप बनकर, देवळा-चांदवडचे आ. डॉ. राहुल आहेर यांचा समावेश आहे. देवळालीच्या राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार सरोज अहिरे यांनी शुक्रवारी आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ होत असताना त्यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा असल्याचे सांगितले. आंदोलनापासून अंतर राखणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
कोणत्याही पक्षाला मराठा समाजाची नाराजी परवडणारी नाही. त्यामुळे नाराजीचा सूर उमटल्यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आज लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटले आहेत. विशेषत गरीब कुटुंबासाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे.
शासनाने केवळ तात्पुरते आश्वासन न देता कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. मराठा समाजाच्या न्याय मागण्या मान्य करण्याची मागणी खासदार वाजे यांनी केली. तर दिंडोरी लोकसभेचे खा. भास्कर भगरे हे मुंबईत थेट आंदोलनस्थळी गेले. मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविल्याचे सांगण्यात आले. या निवडक लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता सत्ताधारी पक्षातील कोणी पुढे आले नाहीत, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे समितीत असून ते तिथून काम करीत असल्याचा दाखला काहींनी दिला. सत्ताधारी महायुतीतील लोकप्रतिनिधींनी मौन बाळगणे पसंत केले.