नाशिक – नार-पारविषयी आपण घेतलेली भूमिका हा मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी योग्य पर्याय असून केंद्र सरकारने मदत न केल्यास राज्य सरकार स्वत: टप्प्याटप्य्याने पैसे खर्च करुन योजना राबविणार, असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वेगवेगळ्या मुद्यांकडे लक्ष वेधले.

मराठवाड्याला टंचाईच्या अडचणीपासून दूर करायचे असेल तर आपण सांगितलेल्या पर्यायाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने योजनेसाठी मदत न केल्यास आम्ही आमचे पैसे खर्च करू, असे भुजबळ यांनी नमूद केले. पुढील निवडणुकीत पराभव दिसत असल्याने सरकारी योजना जाहीर होत असल्याची विरोधकांची टीका आहे. वास्तविक विरोध करणे, हेच विरोधकांचे काम आहे. निवडणुका कधीही जाहीर झाल्या तरी महायुती सत्तेत येईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या दिंडोरी येथील कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे छायाचित्र त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी लावले असेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. येवला-लासलगाव मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार आणि भरघोस मतांनी विजयी होणार, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Kasara Ghat Accident: कसारा घाटात टँकर दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

हेही वाचा – नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

नाशिक-मुंबई महामार्गाचे काम जलद व्हावे

नाशिक -मुंबई महामार्ग दोन दिवसांपासून कोंडीयुक्त झाला आहे. कामाला सुरूवात झाल्याने २०-२५ टक्के फरक जाणवत आहे. कामाला वेग येण्याची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: महामार्गावर येत कामाची पाहणी केली. हा केवळ नाशिकचा प्रश्न नाही. दिल्लीपर्यंत वाहतूक होत असते. लवकरात लवकर योग्य पद्धतीने महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.