नंदुरबार – सरकारने धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास सत्ताधारी आमदार असूनही सरकारमधून बाहेर पडेल, असा इशारा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे. आपण आमदार असेपर्यंत कोणी कितीही जोर लावला तरी आदिवासींमधून इतरांना आरक्षण मिळू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करुन त्यानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य करताच याच गॅझेटनुसार बंजारा समाजाने आपल्याला देखील अनुसूचित जमाती प्रवार्गात सामावून घेण्याची मागणी केली. यासाठी बंजारा समाजाच्या नेत्यांनी मुंबईत बैठकही केली.
आधीच आदिवासींमध्ये सामावून घेण्यावरुन धनगर समाज आक्रमक असतांनाच आता बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार आदिवासी प्रवर्गात सामावून घेण्याच्या केलेल्या मागणीनंतर सरकार अडचणीत येतांना दिसत आहे. या मागणीनंतर आदिवासी समाज देखील चांगलाच आक्रमक झाला असून आता त्यांनी देखील याला विरोध करत निवेदन देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
मात्र बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीवरुन शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवींनी तर थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशाराच देवून टाकला आहे. या विषयावरुन पत्रकारांनी आमदार आमश्या पाडवी यांनी विचारणा केली असता, गॅझेट आला म्हणून कोणी आदिवासी झाला, असे होत नाही, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी होण्यासाठी आदिवासींच्या पोटी जन्म घ्यावा लागतो. इतकेच काय तर सरकारने बंजारा किंवा धनगरांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास मी सत्ताधारी असूनही सरकारमधून बाहेर पडेल. कितीही आंदोलने झाले तरी आदिवासींमधून धनगर आणि बंजारा यांना आरक्षण देवू देणार नाही. अशी रोखठोक भूमिका आमदार पाडवी यांनी मांडली. याआधी देखील धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला असतांना आमदार आमश्या पाडवी यांनी या भूमिकेला विरोध केल्याचे पहायला मिळाले आहे.
सत्ताधारी आमदार असतांना देखील समाजासाठी सत्तेपुढे झुकायचे नाही, ही आमदार आमश्या पाडवी यांची प्रखरता दिसून आली आहे. राज्यातला क्रमांक एकचा मतदार संघ असलेल्या अक्कलकुवा-अक्राणीमधून आमश्या पाडवी नुकतेच निवडून देखील आले आहेत.
मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असताना त्यांनी पाडवी यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर काही दिवसांनी पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत ते शिंदे गटाचे उमेदवार होते. आपली रांगडी आदिवासी भाषा आणि प्रखर भाषणांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर इतर आदिवासी लोकप्रतिनिधीही आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.