नंदुरबार – शनिवारी दिवसभर संपूर्ण राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकींचा उत्साह असताना नंदुरबारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक वेगळाच सोहळा पार पडला. नंदुरबारकरांचे आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेली दादा गणपती आणि बाबा गणपती यांच्या रथोत्सवाची हरिहरभेट रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झाली. रोषणाई, आतषबाजी यांच्यासह भक्तांच्या जयघोषाने हरिहर भॆट चौक दुमदुमून गेला. हरिहर भेटप्रसंगी दोन जण रथाच्या चाकाखाली येण्यापासून बचावले. यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नंदुरबार येथील गणेश विसर्जन मिरवणूकीचे आकर्षणाचे केंद्रबिंदु दादा आणि बाबा गणपतीचा हरिहर भेटीचा उत्सव असतो. शनिवारी सकाळी विधीवत पूजेनंतर प्रथम मानाचा गणपती असलेल्या दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी सर्व मोठ्या नेत्यांनी दादा गणपतीच्या रथाची दोर ओढत विसर्जन मिरवणूकाला प्रारंभ गेला. सायकांळी पाच वाजेच्या सुमारास दादा गणपतींचा रथ हा शहरातील गणपती मंदिराजवळ आला. यावेळी आरतीनंतर गुलालाची उधळण झाली.

दुसरीकडे, बाबा गणपतीदेखील दुपारी दोनच्या सुमारास रथावर विराजमान होवून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.र सर्वांना आस लागली होती ती दादा आणि बाबा गणपतींच्या हरिहर भेट महोत्सवाची. परंतु, गणपती मंदिरापासून ते सोनार खुंटमार्गे जळका बाजारातील हरिहर भेट चौक गाठण्यासाठी दादा गणपतींच्या रथाला तब्बल सात तासाहूनचा अधिक कालावधी लागला. ठिकठिकाणी आरती आणि गणेश भक्तांचा उत्साह यामुंळे दादा गणपतीचा रथ साडे अकरा वाजेच्या सुमारास हरिहर भेट चौकात दाखल झाला. दोन्ही रथ हरिहर भेट चौकात येण्याआधी पोलीस प्रशासनाने चौकात गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली.

महिलांना प्राधान्य देवून पुरुषांना मागे करण्यात पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. साडे अकरा वाजेच्या सुमारास दादा आणि बाबा गणपतींचे रथ हे हरिहर भेट चौकात आल्यानंतर हा सोहळा याची देही याची डोळा साठवण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. यावेळी मंत्र पुष्पांजलींसह दोन्ही मडंळाच्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या गणरायाची आरती केल्यानंतर गुलालाची उधळण, फटांक्याची आतषबाजी झाली. यानंतर पहिले दादा गणपती आणि मग बाबा गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील सोनी विहीर परिसरात या दोन्ही गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

दोन जण जखमी

नंदुरबारमध्ये हरिहर भेट महोत्सवाप्रसंगी एकजण गणपतीच्या रथाच्या खाली येतांना वाचला. परंतु, त्याच्या पायला इजा झाली. अजून एक जण जखमी झाला. दुसरीकडे, माळीवाड्याच्या गणरायाची मिरवणूकही शांततेत पार पडली. मुस्लिमबहुल भागातून जाणारी ही विसर्जन मिरवणूक पोलीस प्रशासनासाठी कसोटीची असते. यंदा सर्व मिरवणूक शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. रात्री १२ वाजता वाद्य परवानगी संपल्यानंतर मानाचे गणपती वगळता सर्वच मंडळ गणेश विसर्जनासाठी प्रकाशा येथे रवाना झाले.