नाशिक – काही महिन्यांपासून शहराचा गुन्हेगारीचा परिघ वाढत आहे. किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे हत्यांपर्यंत पोहचली आहेत. शहरात हत्यासत्र सुरु असून रविवारी मुंबईनाका परिसरात भिक्षेकऱ्याची किरकोळ कारणातून हत्या करण्यात आली. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
जयेश रायबहाद्दूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बंडू गांगुर्डे (३५, रा. बाऱ्हे, सुरगाणा, हल्ली उड्डाणपुलाखाली, वडाळा नाका) या युवकाची हत्या करण्यात आली. याबाबत आक्की गांगुर्डे या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मोलमजूरी करणारे गांगुर्डे दाम्पत्य काही दिवसांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळा नाका भागातील उड्डाणपुलाखाली वास्तव्य करु लागले. भीक मागून अथवा मोलमजूरी करून उदनिर्वाह भागवत होते.
शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पती-पत्नी पुलाखाली जेवणाची तयारी करीत असतांना काही अंतरावर रायबहाद्दूर हा गांगुर्डे दांम्पत्याच्या झोपण्याच्या जागेवर लघुशंका करतांना दिसला. बंडू गांगुर्डे यांनी त्यास विरोध केल्याने रायबहाद्दूरने बंडू यांच्यावर धारदार चाकुने हल्ला केला. यावेळी अक्काबाईने आरडाओरड करताच संशयित पळून गेला. गंभीर जखमी बंडू यास अन्य भिकाऱ्यांच्या मदतीने रात्री घरगुती औषधोपचार करण्यात आला. रात्रभर तसेच झोपून ठेवत सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु, रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई नाका भागात सध्या नवरात्रोत्सवामुळे ग्रामदैवत कालिका माता यात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली आणि शहरातील विविध सिग्नल भागात भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवसभराच्या कमाईतून अनेक भिकारी हे अमली पदार्थाची नशा करती असल्याने त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जयेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका आणि सातपूर पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.
तीन दिवसात तीन हत्या
शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी पोलीस तडीपारी, मकोका, तपासणी मोहीम अशा वेगवेगळ्या माध्यमातून सक्रिय असताना गुन्हेगार मात्र सातत्याने पोलीस यंत्रणेला आव्हान देत आहेत. सातपूर येथील श्रमिकनगरात पार्थ पॅलेसजवळ बुधवारी रात्री जगदीश वानखेडे (२२) या कंपनी कामगारावर गुंडांनी हल्ला केला. त्याला अडवून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेला काही तास होत नाही तोच पाथर्डी फाटा परिसरातील सेल पेट्रोल पंपाच्या बाजूला गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाकडे जाणाऱ्या एका व्यापारी संकुलातील कॅफेत २२ वर्षीय राशिद खान या युवकावर पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला. शनिवारी बंडु गांगुर्डे याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.