नाशिक – तालुक्यातील चुंचाळे गावाजवळील शहरासाठी ऑक्सिजन पार्क म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री नाशिक पंचवटी पांजरपोळच्या जैवविविधता क्षेत्रात सायबेरिया आणि उत्तर चीनच्या प्रदेशातून ‘ तपकिरी खाटिक (ब्राऊन श्राइक) या पक्ष्याचे आगमन झाले आहे. तपकिरी खाटिक हा लहान आकाराचा परंतु, अत्यंत बुद्धिमान आणि आक्रमक स्वभावाचा पक्षी आहे. तपकिरी खाटिक हा एक स्थलांतरित पक्षी आहे.

लॅनिडे या कुलात आणि पासेरीफोरमस या गणातील या पक्ष्याचा आकार १८ ते २० सेंटीमीटर इतका असतो. वजन २५ ते ३५ ग्रॅम असते. त्याच्या वरच्या शरीराचा रंग तपकिरी असून पोटाचा भाग पांढरट ,डोळ्यांवर असलेली काळी पट्टी हा त्याचा ओळखण्याजोगा भाग आहे. हा पक्षी मोकळ्या झुडपी प्रदेशात, शेती भागात आणि बागांमध्ये राहणे पसंद करतो. तो झाडांच्या टोकावर बसून शिकार शोधतो.

कीटक, अळ्या, लहान सरडे, बेडूक आणि कधी कधी लहान पक्षी हे त्याचे अन्न आहे. शिकार केलेल्या प्राण्यांना तो काटेरी फांद्यांवर टांगून ठेवतो, त्यामुळे त्याला मराठीमध्ये खाटिक पक्षी म्हणतात. हा एक आकर्षक आणि कीटकभक्षी स्थलांतरित पक्षी आहे. याची चोच मजबूत आणि किंचित वाकडी असते. तिचा उपयोग कीटक किंवा लहान शिकार पकडण्यासाठी उपयुक्त ठरते. नर आणि मादी दोघांचे स्वरूप जवळजवळ सारखेच असते. हा पक्षी शहराच्या बाहेरील भागात किंवा ग्रामीण परिसरात जास्त प्रमाणात आढळतो.

हा पक्षी दरवर्षी उत्तर आशियातील थंड प्रदेश सायबेरिया, मंगोलिया, चीन आणि रशियाच्या ईशान्य भागातून भारतात स्थलांतर करतो. उबदार हवामान असलेल्या भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड या देशांमध्ये तो स्थलांतर करतो. महाराष्ट्रात तो प्रामुख्याने सप्टेंबर ते एप्रिल या काळात दिसत असल्याचे पक्षी अभ्यासक प्रा.आनंद बोरा यांनी सांगितले.

हा पक्षी नंतर पुन्हा आपल्या मूळ प्रदेशात परततो. हा पर्यावरणातील कीटकसंख्या नियंत्रित करणारा उपयुक्त पक्षी आहे. तो शेतीसाठी लाभदायक आहे. कीटक नियंत्रणात मदत करतो. अशा प्रकारे तो जैवसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. नाशिकच्या चुंचाळे गावाजवळील श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ जैवविविधता क्षेत्रात तीन लाख वृक्ष लावून संवर्धन करण्यात आले आहे. येथील तयार केलेल्या तलावाजवळ स्थलांतरित पक्षी बघावयास मिळतात. परिसरात पक्ष्यांना मुबलक खाद्य मिळत असल्याने पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे.

श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ जैवविविधता क्षेत्रात पाच वर्षांपासून पक्ष्यांचा अभ्यास करत असून पडीत माळरानावर हिरवाईची चादर पसरल्यामुळे येथे अनेक पक्षी,वन्यप्राणी,फुलपाखरू,कीटक बघावयास मिळतात. आतापर्यंत १६० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती येथे पाहण्यात आल्या आहेत. यावर्षी तब्बल सहा महिने पाऊस पडल्याने परिसरात अनेक स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली असून थंडी वाढल्यावर पक्ष्यांची संख्या आणखी वाढणार आहे. – प्रा.आनंद बोरा (पक्षी अभ्यासक).