नाशिक : जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून काही दिवसांचा अपवाद वगळता त्यात खंड पडलेला नाही. या पावसामुळे मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांची पातळी झपाट्याने वाढत असून जुलै महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ धरणे तुडुंब भरली आहेत. तसेच १४ धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात मोठे आणि १९ मध्यम प्रकल्पांमध्ये ५६९७३ दशलक्ष घनफुट म्हणजेच ८० टक्के जलसाठा झाला आहे.
यंदा पावसामुळे जिल्ह्यावर चांगलीच कृपा केली आहे. मे महिन्यात वळवाचा पाऊस सातत्याने कोसळला. त्यानंतर जून महिन्यात वेळवर आलेला मान्सूनही तग धरुन राहिला. तेव्हापासून सुरु असलेला पाऊस जुलैत आठवड्याभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कोसळत आहे. सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना पेरण्या करता आलेल्या नाहीत. पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्याचा परिणाम बाजार समित्यांमधील आवकवर झाला आहे. त्यातच टोमॅटोसारख्या नाजूक पिकाला पावसाचा अधिक फटका बसला. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी असल्याने टोमॅटोची काढणी करणेही शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये त्यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली असून परिणामी किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ५० रुपये किलोपेक्षा अधिक झाले आहेत.
दुसरीकडे, सततच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांची टँकरपासून सुटका झाली. परंतु, बागलाण, मालेगाव आणि नांदगाव या तीन तालुक्यांमध्ये १० टँकरव्दारे काही फेऱ्या अजूनही सुरु आहेत. त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा टँकरमुक्त होण्यासाठी सर्वत्र पावसाची अजूनही गरज आहे. ३१ जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यात काश्यपी, गोतमी गोदावरी, आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी, केळझर, माणिकपुंज यांचा समावेश आहे. एकूण २६ प्रकल्पांमधील जलसाठा आता ८० टक्क्यांवर पोहचला आहे.
१४ प्रकल्पांमधून विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील १४ प्रकल्पांमधून सध्या विसर्ग करण्यात येत आहे. त्यात दारणा, नांदुरमध्यमेश्वर, वालदेवी, आळंदी, भावली, भाम, वाकी, कडवा, वाघाड, पुनेगाव, गंगापूर, गौतमी गोदावरी, पालखेड, काश्यपी यांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक येथील अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ करण्यात आलेल्या व्यवस्थेतूनही विसर्ग सुरु आहे. भोजापूर धरणातून सुरु करण्यात आलेला विसर्ग गुरुवारी बंद करण्यात आला.