नाशिक : कुंभनगरी आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारी करणाऱ्या या टोळ्यांमधील टोळीयुध्दही आता नाशिककरांसाठी त्रासदायक होऊ लागले आहे. सिंहस्था कुंभमेळ्याच्या आयोजनात विकास कामांचे नियोजन कसे करावे, याविषयी चर्चा होत असताना दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीविषयी कोणीही ब्र काढत नसल्याचे दिसते. या पार्श्वभूमिवर टोळीयुध्दाचा भडका पंचवटीसह नाशिकरोड परिसरातही उडाला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी पेठरोडवरील राहुलवाडीत सराईत गुंड सागर जाधव याच्यावर गोळीबार प्रकरणी ११ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेले निकम टोळीतील आहेत. दुसरीकडे, नाशिकरोड परिसरात म्हस्के टोळीतील सहा गुन्हेगारांना तसेच बेद टोळीतील कुख्यात डिंगम माले यास अटक करण्यात आली. कित्येक दिवसानंतर नाशिक पोलिसांनी बजावलेली ही मोठी कामगिरी म्हणता येईल.
नाशिकमध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत. पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे फावते, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. अनेक गुन्हेगारांना असलेले राजकीय पाठबळही चर्चेत आहे. पंचवटीतील सागर जाधववरील गोळीबार प्रकरणी पंचवटी पोलीस, गुंडाविरोधी पथक आणि भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोहीम राबवून संशयित निलेश पवार ( २७, रा. मेहेरधाम, पेठरोड, पंचवटी), आकाश निकम (२४), रोशन आहिरे (३०, रा. कर्णनगर,पंचवटी), सचिन गांगुर्डे (२१, फुलेनगर, पंचवटी), इरफान खाटीक (४४, रा. जयवंत सोसायटी, म्हसरुळ, पंचवटी), आकाश उर्फ बंटी दोंदे (३०, रा. पेठरोड, पंचवटी), आदित्य आहिरे (२२, रा. शिंदेनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी), नितीन खलसे (३२, वैशालीनगर, पंचवटी), साहिल शेख (२१, वैशाली नगर, पंचवटी), भारत कंकाळ (२५, राजेय सोसायटी, पंचवटी), योगेश जाधव (२९, रा. राहुलवाडी, पंचवटी) या ११ जणांना अटक केली. विकी आणि विकास वाघ तसेच अमोल पारे उर्फ बबल्या आणि अजून काही जण फरार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
पंचवटीतील पेठरोडवर २०१७ मध्ये उघडे टोळीने सराईत गुन्हेगार किरण निकम याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सागरवर हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
दुसरीकडे, नाशिकरोड परिसरातही अनेक टोळ्या कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यापैकी म्हस्के टोळीतील सहा जण आणि बेट टोळीचा शार्पशूटर म्हणविला जाणारा आणि अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असलेला कुख्यात डिंगम माले यास ताब्यात घेतले. म्हस्के टोळीने केरला टोळीतील आदित्य जारस उर्फ बिल्ला यास मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात घुसून पैशांची लूट केली होती. वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकलहरे रोड परिसरातील किर्लोस्कर टेकडी येथे पाठलाग करुन म्हस्के टोळीतील धनंजय म्हस्के, मयूर जानराव, तुषार सावंत, ऋषिकेश पवार, अभिनव जाधव यांना अटक केली.
तसेच नाशिकरोड परिसरात दहशत असलेल्या बेद टोळीतील रोहित उर्फ माले डिंगम (रा. गोरेवाडी, नाशिकरोड) यास पाठलाग करुन पोलिसांनी पकडले. वर्षभरापासून तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी दोन दिवसात केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचे नाशिककरांकडून स्वागत होत आहे.