नाशिक – बिअर बारमध्ये झालेला वाद मिटविणाऱ्यांशी झटापट झाल्यानंतर उद्भलेल्या हाणामारीत सातपूर येथील आयटीआय सिग्नलजवळील हॉटेल ऑरो येथे रविवारी पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) नाशिकचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीचा सहभाग उघडकीस आला. लोंढे टोळी संबंधित हाॅटेल चालकाकडून खंडणी वसूल करीत होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लोंढे टोळीतील तीन जणांना सोमवारी न्यायालयात दाखल करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सूत्रधार भूषणसह इतर संशयित फरार आहेत.

सातपूर येथील माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण याच्याविरुध्द याआधीही हाणामारी, खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. सातपूर येथे आयटीआय सिग्नलनजीक हॉटेल ऑरा येथे रविवारी पहाटे गोळीबाराचा प्रकार घडला. मध्यरात्री हाॅटेलमध्ये उपस्थित काही तरूणांमध्ये वाद झाले. त्यांनी बारमधील खुर्ची, टेबल, साहित्याची नासधूस केल्याने तेथील बाऊन्सर्सनी त्यांना बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा वाद झाल्याने भूषण लोंढे हा साथीदारांसह तेथे आला. त्याने साथीदारांच्या मदतीने तरूणांना बाहेर काढले. त्यावेळी वाद झाल्याने लोंढे, प्रिन्स यांनी वरूण तिवारी या ग्राहकाच्या डाव्या पायावर धारदार हत्याराने वार केला. शुभम उर्फ भुराने गोळी झाडली. गोळी तिवारीच्या मांडीला लागल्याने तो वाचला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संशयित भूषण लोंढे हा सातपूर, अंबड परिसरात सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर यापूर्वी गोळीबार, हल्ल्याचे प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीररित्या मिरवणुका काढणे, यासंबंधी गुन्हे दाखल आहेत. काही वर्षापूर्वी आव्हाळे-गवळी दुहेरी हत्याकांडात भूषण, सनी , प्रिन्स यांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांची मुक्तता झाली.

हाॅटेल ऑरो गोळीबार प्रकरणात सातपूर पोलिसांनी शुभम पाटील उर्फ भुरा, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे, दुर्गेश वाघमारे या तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याविषयी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली. या प्रकरणात १० ते १२ जणांचा सहभाग आहे. अन्य सशयितांच्या शोधासाठी तपासी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शुभम पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अन्य संशयितांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांसमोर आता राजकीय दबाव न स्वीकारता लोंढे टोळीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान आहे.

भूषण लोंढे टोळीची खंडणीसाठी अनोखी युक्ती

सातपूर, अंबड आणि त्र्यंबकरोडवरील हॉटेल, रेस्टॉरंट बार यांसह अनेक उद्योजकही भूषण लोंढे टोळीच्या कारवायांना वैतागले आहेत. भूषण लोंढे टोळी काही माणसांना हाॅटेलमध्ये पाठवत असे. त्या ठिकाणी जाऊन वाद घालायला सांगत. भूषण भाईची माणसे असल्याचे सांगून ते व्यावसायिकांना धमकी देत. याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याने व्यावसायिकांकडून भूषण यास मध्यस्थी करण्यास सांगितले जात असे. भूषण मग प्रोटेक्शन मनी या नावाखाली व्यावसायिकांकडून खंडणी घेत असे.