नाशिक : अंबड आणि सातपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील भूखंड गैरव्यवहारसंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने तसेच प्रशासकीय यंत्रणा दाद देत नसल्याने गाऱ्हाणे मांडण्यासाठी राष्ट्रपतींची भेट घेण्याचा निर्णय येथे आयोजित पाच गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी नाशिक -दिल्ली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासह चार ठराव करण्यात आले.

अंबड इंडस्ट्रियल ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत साखळी उपोषण स्थगित करण्यात आले अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी आयमा कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले होते. गुरुवारी दुपारी अंबड, सातपूर, राजुर बहुला, आडवण, पारदेवी येथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख प्रतिनिधीची बैठक झाली. या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले.

अंबड आणि सातपूर एमआयडीसीतील विकासक, गुंतवणूकदार तसेच राजूर बहुला आणि आडवण, पारदेवी येथील गुंतवणूकदारांची १४ ऑगस्ट रोजी ईडी तसेच आयकर कार्यालयाकडे तक्रार करणे, अंबड आणि सातपूर येथे अनेक भूखंड गैरव्यवहार झाले असल्याने भूसंपादनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, आठ ऑगस्ट रोजी माजी आमदार बच्चू कडू यांची पुणे येथे भेट घेऊन त्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी निमंत्रित करणे, असे ठराव करण्यात आले. या लढ्यात कोणतेही सहकार्य न करणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा जाहीर मेळाव्यात निषेध करण्याचेही ठरविण्यात आले.

सर्व पाचही गावातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी या ठरावांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरले. यावेळी साहेबराव दातीर, चंद्रकांत दातीर, अविनाश फडोळ, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, ज्ञानेश्वर कोकणे, सुरेश कोकणे आदी उपस्थित होते.