नाशिक – गणेशोत्सवात जाहिरात कर आणि मंडप शुल्क आकारणीला विरोध करुन ते माफ करावे आणि शहरातील सर्व रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली. जुन्या मंडळांना त्वरित परवानगी देण्याचा आग्रह धरण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी नाशिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रमुख समीर शेट्ये, दंडे हनुमान मंडळाचे प्रमुख तथा माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह विविध मंडळांचे अध्यक्ष, माजी नगरसेवक व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत सूचना केल्या.
गणेशोत्सवात मनपा स्वागत कमानी उभारण्यासाठी प्रत्येकी ७५० रुपये आणि तेवढीच रक्कम मंडपसाठी घेते. तर जाहिरात करापोटी प्रति चोरस फूट प्रतिदिन ३० रुपये आकारले जातात. हे सर्व कर आणि शुल्क माफ करण्याचा आग्रह सर्वच मंडळांनी धरला. अनेक रस्त्यांवर खड्डे असून ते तातडीने बुजविण्याची आवश्यकता मांडण्यात आली. संघटनेचे प्रमुख समीर शेट्ये यांनी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जुन्या मंडळांना तत्काळ परवानगी द्यावी. नव्या मंडळांसाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडावी, याकडे लक्ष वेधले.
मुख्य मिरवणूक मार्गांची स्वच्छता आणि या मार्गावरील मार्गांवरील मांस दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली. गजानन शेलार यांनी गणेश मंडळांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी गरजेची असल्याचे नमूद केले. बी. डी. भालेकर मैदान व महावितरणशी संबंधित समस्या मांडण्यात आल्या.गणेश मंडळांना एक खिडकी योजनेतून महानगरपालिका परवानगी देणार आहे. गणेशोत्सवात शहरात स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते ठेवण्याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली.
पोलीस, आरटीओ, अग्निशमन व संबंधित यंत्रणांकडून अंतर्गत परवानग्या घेण्यास वेळ लागतो. जाहिरात आणि मंडप शुल्काबाबत तूर्तास काही सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. कचऱ्याबाबत तक्रारी ये्णार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. गणेश मंडळांनी कचरा विलगीकरण केल्यास संकलन सोपे होईल. शून्य प्लास्टिकचा अवलंब करण्याची अपेक्षा आयुक्त खत्री यांनी व्यक्त केली.
महावितरणशी संबंधित प्रश्न त्यांच्यासमवेत बैठक घेऊन सोडविले जातील. मंडपांच्या पाहणीवेळी वीज कंपनीचे प्रतिनिधी राहतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. पावसामुळे शहरातील खड्डे दुरुस्तीच्या कामात अडथळे आले. प्रमुख रस्त्यांवरील खड्डे कमी झाले असले तरी अंतर्गत काही रस्त्यांवर खड्डे आहेत. पावसाने उघडीप घेतल्यानंतर खुड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल, असे खत्री यांनी स्पष्ट केले.