नाशिक : पावसाने नव्याने जोर धरल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण १२ धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. सर्वच धरणे तुडुंब असल्याने विसर्गाशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून मराठवाड्यातील जायकवाडीकडे आतापर्यंत ४७ हजार ६२२ दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास ४८ टीएमसी इतक्या पाण्याचा विक्रमी विसर्ग झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार, पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकला आहे. कधी विजांच्या कडकडाटात तर कधी संथपणे संततधार होत आहे. गुरुवारपासून त्याचा जोर वाढला. शहरातील रस्ते व चौकात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. तात्पुरत्या स्वरुपात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत. लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये सध्या ६४ हजार ३४० दशलक्ष घनफूट म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाचे येणारे पाणी साठविण्यास धरणात जागा शिल्लक नसल्याचे विसर्ग करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी गंगापूर धरणातून ११६९ क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. याशिवाय दारणा २००४, कडवा १६६०, भाम ११२०, वालदेवी ३०, आळंदी ३०, भावली १३५, वाघाड २२९, वाकी ११६, नांदूरमध्यमेश्वर बंधारा १५२४८, कश्यपी ३२०, करंजवण ६०२ क्युसेकचा विसर्ग करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक जिल्हा बँकेच्या सभेत गोंधळ, बड्या थकबाकीदारांना मिळणारे अभय चर्चेत

तीन समुहातील पाणी मराठवाड्याकडे

गंगापूर, दारणा आणि पालखेड समुहातील धरणांचे पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे गोदावरी नदीतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते. यंदा वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे आधीच पूर्ण क्षमतेने भरली. खालील भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याकडे ४७ हजार ६२२ दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास ४८ टीएमसी पाणी सोडल्याची आकडेवारी आहे. या पाण्यातच जायकवाडी धरण जवळपास निम्मे भरल्याचे पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik gangapur water discharged from 12 dams 48 tmc water for marathwada s jayakwadi dam css