नाशिक – राज्यातील अंगणवाड्यांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविल्या जाणाऱ्या आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रमाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर अधांतरी आहे. यासंदर्भात अद्याप ना अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण मिळाले, ना शैक्षणिक साहित्य.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक विभागात अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी नव्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात याची अंमलबजावणी होणार आहे. अभ्यासक्रमाला ‘आधारशिला बालवाटिका-१’, ‘आधारशिला बालवाटिका-२’ आणि ‘आधारशिला बालवाटिका-३’ अशी नावे देण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महिला व बाल विकास विभागाने तयार केला आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून तो लागु होईल. यामध्ये अंक आणि अक्षर ओळख, स्पर्शज्ञान, रंगज्ञान, सामान्यज्ञान यावर भर देण्यात आला आहे. यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण आणि पूरक साहित्य अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यात सुमारे ३० लाख बालकांना या नव्या अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार असून हे शिक्षण कृतीयुक्त, खेळाच्या माध्यमातून आणि बालकाच्या सर्वांगीण विकासावर आधारित असेल.
नाशिक जिल्ह्यात पाच हजार १२१ अंगणवाड्या आहेत. यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील एक लाख ७७ हजार ४९४ विद्यार्थी आहेत. मात्र नव्या अभ्यासक्रमानुसार अभ्यासक्रम, शैक्षणिक साहित्य अद्याप अंगणवाड्यांमध्ये पोहचलेले नाही. यामुळे नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी होणार, या विषयी साशंकता व्यक्त होत आहे.
याविषयी महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन शिंदे यांनी माहिती दिली. अंगणवाडी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही शिक्षण विभागाच्या वतीने होणार आहे. याबाबत अद्याप सूचना प्राप्त नाही. अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण झालेले नाही. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्यात होणार आहे. १२ वी उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्णच्या निकषावर त्यांचा प्रशिक्षण कालावधी ठरेल. जुन्या अभ्यासक्रमातील साहित्य आपल्याकडील काही मोजक्या केंद्रावर आहे. या मध्ये अक्षर आणि अंक ओळखसंदर्भातील साहित्य आहे.
शासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात ज्या अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भरतात त्या ठिकाणी हे प्रायोगिक तत्वावर राबवले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील एखादी खोली रिक्त असेल तर ती ताब्यात घेण्याविषयी सांगण्यात आले असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.