नाशिक – नवरात्रोत्सवात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोटमगाव येथील जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. सप्तश्रृंग गड आणि चांदवड येथील देवींचे स्थान डोंगरावर, डोंगर कपारीत आहे. परंतु, कोटमगावच्या जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी कुठेही डोंगरावर जाण्याची गरज नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत सर्वांची या देवीच्या दर्शनासाठी गर्दी असते.
श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक स्वरुपातील दर्शन कोटमगाव येथील देवस्थानात घडते. नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. कोटमगावला नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. दर्शनासाठीच नव्हे तर, घटी बसण्यासाठीही राज्यभरातून येथे भाविक येतात. वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या येथील यात्रेला सोयी-सुविधांमुळे नवा साज मिळाला आहे. वर्षानुवर्ष गर्दीत दिवसागणिक वाढ होत आहे. जगदंबा मातेची प्रसन्न तेजस्वी तीन फुट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधते. तीनही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने या देवस्थानाला विशेष महत्व आहे.
सप्तशृंगी, माहूरची देवी आणि तुळजापूरची देवी या तीन क्षेत्रांचे उगमस्थान म्हणून कोटमगावची जगदंबा माता मानली जाते. परराज्यांतही देवीचे भाविक असून नाशिक, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह गुजरातमधूनही भाविक दर्शनाला येतात. जवळपास दोन हजारांपर्यंत भाविक नऊही दिवस घटी बसतात. भक्त निवास झाल्याने घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. अनेक जण पैठणी, शालू, प्रसाद वाहून नवसपूर्ती करतात. ग्रामीण भागातून नऊ दिवसांत हजारो भाविक दर्शनाला येतात. शहरातील तीन ते पाच हजार भाविक रोज पहाटे पायी जाऊन दर्शन घेत असतात.
देवस्थानलगत नारंगी नदी आहे. परिसरातील झाडींमुळे देवस्थान निसर्गरम्य वाटते. उत्सव काळात येवला ते कोटमगाव दरम्यान रोज हजारवर भाविक पायी दर्शनाला येत असतात. या ठिकाणी वाहनाने येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ नसल्याने गैरसोय होते. नाशिक-येवला महामार्गावरच कोटमगाव आहे. त्यामुळे मंदिर परिसर आणि महामार्गालगतच यात्रोत्सवात दुकाने थाटली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. यंदा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे.
या देवस्थानाविषयीच्या आख्यायिकेनुसार, जालिंदराच्या मृत्युमुळे सतीने विष्णूंना शालीग्राम होण्याचा शाप दिल्याने ते पडले. विष्णूंचा शोध घेतांना देवी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीला विष्णू कोटमगाव येथे शालीग्राम रुपात दिसले. त्यांनी सतीवृंदेचा उद्धार करून विष्णूंना शापमुक्त केले. आणि तिघी कोटमगावस्थळी रज, तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रुपात वास करू लागल्या. त्यांचे त्रिगुणात्मक गुप्तरूप एका शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाले.