नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध मंत्री, वेगवेगळ्या विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदींची वर्दळ वाढली आहे. या मान्यवरांच्या निवास व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहरात विश्रामगृह आहे. तथापि. महानगरपालिकाही आता स्वतंत्रपणे विश्रामगृह उभारणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या बी. डी. भालेकर शाळेची इमारत जमीनदोस्त केली जाणार आहे. काही वर्षांंपूर्वी या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत वर्ग करून ती बंद करण्यात आली. आता बंद केलेल्या मराठी शाळेच्या जागेवर नेते, अधिकाऱ्यांसाठी चार कोटी रुपये खर्चून अलिशान विश्रामगृह उभारण्याची तयारी करण्यात आली आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड, युगंधर पाटील, दर्शन पाटील, कल्पेश केदार यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मनपा प्रशासनाच्या निर्णयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. प्रशासनाला सुद्बुद्धी व्हावी म्हणून अनोखे आंदोलन करण्यात आले. ज्यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त भावनेतून तत्कालीन नगरपालिकेला शाळा उभारण्यासाठी जागा, सर्वतोपरी अर्थसहाय्य केले. त्याचाच परिणाम स्वरूप मध्यवर्ती ठिकाणी बी. डी. भालेकर यांच्या नावाने एक देखणे विद्यालय निर्माण झाले. ज्या विद्यालयाने अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उघडून दिले, आज हजारो विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत. काळानुसार मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेचे मूल्य अधिक असल्याने या शाळेवर अनेकांची नजर पडली. ही इमारत बड्या धेंडांच्या डोळ्यांमध्ये सलायला लागली, याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले.
महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसाधारण सभेत मागच्या दाराने ही इमारत वेगवेगळ्या संस्थांना देण्याचे प्रस्ताव आले. मध्यंतरी ही इमारत विकण्याचा पूर्ण निश्चय झाला होता. साधारणत: अडीच दशकांपूर्वी एकसंघ शिवसेनेची महापालिकेत सत्ता असतानाच्या काळात या संदर्भात आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भेटून तो प्रस्ताव रद्द करण्याची विनंती केली होती. त्यांनीही हा विषय अतिशय गांभिर्याने घेऊन तेव्हा हा प्रस्ताव रद्द करण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले होते, असे माजी नगरसेविका डॉ. पाटील यांनी नमूद केले..परंतु, महानगरपालिका ही शाळा बंद करण्यासाठीच आतूर होती. त्या अनुषंगाने महापालिकेने पुढील काळात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी करणे, शाळेची दुरुस्ती न करणे, शिक्षकांची संख्या कमी करणे, शाळेबद्दल अनेक वावड्या उठविणे, असे उद्योग करून शाळा बंद पाडली. आता प्रशासकीय राजवटीत कोणालाही कल्पना न देता महानगरपालिकेने या ठिकाणी शाळा जमीनदोस्त करून ज्या गोष्टींची गरज नाही, असे विश्रामगृह बांधण्याचा संकल्प केल्याची भावना यावेळी आंदोलकांनी मांडली.
