नाशिक : सातपूर येथील हॉटेल गोळीबार प्रकरणी पी. एल. ग्रुपवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत असतांना लोंढे टोळीविरूध्द तक्रारींचा ओघ वाढत आहे.
सातपूर परिसरात लोंढे टोळीने आपले गुन्हेगारी साम्राज्य उभे केले होते. या ठिकाणी राहणारे व्यावसायिक, स्थानिकांवर राजकीय बळाचा वापर करत दहशत निर्माण केली होती.
या परिसरात कामगार वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये उत्तर भारतीय लोकांचा भरणा अधिक. आपले गाव सोडत कामाच्या शोधात सातपूर, अंबड औद्योगिक वसाहत परिसरात ही मंडळी राहतात. लोंढे टोळी या लोकांना लक्ष्य करत होती. त्यांची गरज ओळखून पैसे देणे, त्यांच्यावर कामासाठी दबाव आणणे, त्यांनी या ठिकाणी स्थावर मालमत्ता विकत घेतली की ती बळकावण्यासाठी लोंढे टोळीची स्वत:ची अशी पध्दत होती. घरातून संबंधितांना उचलून आणत त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणतांना त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
कोणी विरोध केलाच तर लोंढे टोळीतील कोणाकडूनही मारहाण होत होती. विशेषत: लोंढेच्या घराजवळील लहान मुलेही या टोळीचा भाग बनत असल्याने या परिसरात गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणावर होत होत्या. रात्रीच्या वेळी कामावरून परतणाऱ्या कामगारांना अडवून त्यांच्याकडील पैसे, भ्रमणध्वनी लंपास करण्यात येत असत. दुसरीकडे, घराचा ताबा घेतांना दबावतंत्र वापरले जात होते. याशिवाय व्यावसायिकांकडून खंडणी वसुल केली जात होती. त्यातूनच सातपूर येथील हॉटेल गोळीबार प्रकरण घडले.
दरम्यान, या गुन्ह्यातील पी. एल. गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे उर्फ बॉस आणि त्याच्या टोळीतील सदस्यांविरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पाऊल उचलले. या गुन्ह्याचा पुढील तपास अंबड सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.
प्रकाश लोंढेवर मकोका का ?
पी. एल. गँगचा मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे उर्फ बॉस हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी आहे. त्याने गुन्हेगारी टोळी तयार करुन एकट्याने किंवा संघटितरित्या हिंसाचार, अवैध शस्त्रांचा वापर करून धाकदपटशा दाखवत आर्थिक उलाढाली केल्या. आर्थिक फायद्यासाठी हप्ते गोळा करणे, तसेच परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसुल करणे, अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवले असून नियोजित पध्दतीने गुन्हे केल्याचे तपासात समोर आले. संघटितरित्या गुन्हे केले. त्याच्या आणि टोळीच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत कठोर कारवाईसाठी मकोकाअंतर्गत कारवाईसाठी शिफारस करण्यात आली.
