नाशिक – यंदा गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याने उत्साहाला वेगवेगळे आयाम मिळत आहे. यंदा पारंपरिक वाद्य ढोलवादनास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ढोल पथकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरावासाठी जागा न मिळणे, पावसाचा व्यत्यय यासह इतर गैरसोयींमधून वाट काढत ढोल पथक मिळेल त्या जागेत सराव करत असून विसर्जन मिरवणुकीत अधिकाधिक चांगली कामगिरी कशी होईल, याकडे पथकांकडून लक्ष देण्यात येत आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूक ही लक्षवेधी ठरत असते. ढोल ताशांचा गजर, ध्वज, शंखनाद यासह चित्तथरारक प्रात्यक्षिके यामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांसह परिसरातील गावांमधूनही नागरिक येत असतात. विसर्जन मिरवणूक तसेच उत्सव काळात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ४० पेक्षा अधिक पथके सक्रिय राहतात. मिरवणुकीतील ढोल वादन लक्षवेधी असले तरी ढोल वादकांना सातत्याने वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. याविषयी शिवसंस्कृती ढोल पथकाचे सचिन धारणकर यांनी माहिती दिली.
ढोल ताशा सराव करण्यासाठी अडचणी येतात. सरावाला मोकळी जागा मिळत नाही. शहरापासून दूर जागा मिळण्यासाठी दमछाक होते, यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने सरावात अडचणी आल्या. यंदा शहरातील वेगवेगळ्या गणेश मंडळांसमोर मानवंदना देण्यात आली. विसर्जन मिरवणुकीत ४५ वर्षीय अपंग महिला तसेच एक अपंग व्यक्ती सहभाग घेणार असून नवीन तालही सर्वांना बघता येईल, असे त्यांनी सांगितले.
सहस्त्रनाद ढोल पथकाच्या अमी छेडा यांनीही माहिती दिली. यंदा वेगवेगळ्या मंडळांमध्ये नवीन ताल, वादने झाली. यामध्ये महाकाल नावाचा ताल झाला. ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी वेशभुषा परिधान करत वाद्य वादन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीसाठी नव्या तालावर वादन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतांना पोलिसांकडून सुदैवाने कुठलीच बंधने पथकांवर घालण्यात आलेली नाहीत. निर्बंंधमुक्त मिरवणूकीत ध्वनीच्या भिंती न लावता पारंपरिक वाद्याचा वापर झाला तरच महिलांची सुरक्षा जपली जाईल. मिरवणूक काळात फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी छेडा यांनी केली.
माऊली ढोल पथकाचे सर्जेराव वाघ यांनी, काही बंधनांचा उल्लेख केला. पारंपरिक वाद्य वाजवण्यास परवानगी मिळाली आहे. पावसामुळे वादनात अडचणी येतात. विसर्जन मिरवणुकीवेळी सर्व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. विशेषत: वेळेचे पालन गरजेचे आहे. यामुळे मागील मंडळांनाही वाद्य वादनाचा आनंद घेता येईल. यंदा पावसामुळे वाद्य वादन करण्यात अडचणी आल्याचे त्यांनी नमूद केले.
नाशिकमधील गणेशोत्सवात ढाेल आणि ताशा वादन यांचे वेगळेच महत्व आहे. ढोलवादनास मिळणारी लोकप्रियता पाहून शहरातील ढोल पथकांची संख्या वाढतच आहे. आवाजाच्या भिंतीना येणारे निर्बंध पाहता मंडळांकडूनही ढोल पथकांना विसर्जन मिरवणुकीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे पथकांना सराव करण्यात काही अडचणी येत असल्या तरी त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.