नाशिक – दिल्ली आयआयटीत एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या नाशिक येथील वरद नेरकर (२३) या विद्यार्थ्याने वसतिगृहात आत्महत्या केली. प्रकल्प (प्रोजेक्ट) पूर्ण करताना मार्गदर्शकाकडून मानसिक छळ झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी दिल्लीतील आयआयटी संस्थेच्या वसतिगृहात ही घटना घडली. सकाळी तो प्रकल्पाच्या कामासाठी प्रयोगशाळेत गेला होता. अपेक्षित निष्कर्ष न आल्याने तो वसतिगृहाकडे परतला. या काळात कुटुंबियांशी त्याचे एकदा भ्रमणध्वनीवर बोलणे झाले होते. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. उलट त्यांचे बोलणे ऐकावे लागते, असे त्याने आम्हाला सांगितल्याचे वरदचे वडील संजय नेरकर यांनी ‘लोकसत्ता’कडे नमूद केले. कुटुंबियांनी सायंकाळी त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी वरदच्या मित्रांशी संपर्क साधला. वरदच्या खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने सुरक्षारक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू

वरद हा महाविद्यालयातील हुषार विद्यार्थ्यांपैकी एक होता. दोन महिन्यात त्याचे शिक्षण पूर्ण होणार होते. त्याची मोठ्या कंपनीत निवडही झाली होती. जूनमध्ये तो रुजू होणार होता. परंतु, तत्पूर्वीच ही घटना घडली. या घटनेची माहिती रात्री मिळाल्यानंतर पालकांनी दिल्लीत धाव घेतली. प्रकल्प पूर्ण करताना मानसिक छळामुळे तो तणावाखाली असल्याचे आम्ही किशनगंज पोलीस ठाण्यात म्हणणे मांडल्याचे कुटुंबियांनी सांगितले. दुसरीकडे, संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांकडे, या घटनेबाबत फारसे तपशील नसताना कुठलाही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल असे नमूद केले. वरदने कुणाकडून त्रास होत असल्याचे वा दबाव टाकला जात असल्याविषयी कुठलीही तक्रार केली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – बबन घोलप यांचा फायदा कोणाला ?

दरम्यान, दिल्ली आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असते. देशपातळीवरील कठोर परीक्षा उत्तीर्ण होऊन वरदने प्रवेश मिळवला होता. नाशिकमधील आदर्श शाळेत वरदचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होेते. त्याचे वडील संजय नेरकर हे महापालिकेच्या सेवेत आहेत. आई गृहिणी तर लहान भाऊ अथर्व हा जळगाव येथे बी. टेकचे शिक्षण घेत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik student commits suicide at delhi iit ssb