नाशिक : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन, वर्ग चार कर्मचारी संघटनेने आदिवासी विकास भवनासमोर दिलेला ठिय्या भर पावसातही पाचव्या दिवशी कायम राहिला. प्रवेशव्दारासमोरच हा ठिय्या असल्याने प्रशासनाला वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आंदोलनामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
आंदोलक न हटण्यावर ठाम आहेत. शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तीन तासांहून अधिक काळ चर्चा होऊनही कोणताच तोडगा निघाला नाही. अन्य लोकप्रतिनिधींनीही आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लिखित स्वरुपात कोणीही हमी देण्यास तयार नसल्याने आंदोलक आश्वासनावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. पाऊस आणि उघड्यावरील मुक्कामामुळे काही आंदोलकांना त्रास झाला असला तरी कोणीही माघार घेण्यास तयार नाही. आंदोलकांना काही संघटना, लोकप्रतिनिधी यांच्याकडून जेवण देण्यात येत आहे.
दुसरीकडे, आंदोलकांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने कुठलीही पूर्वसूचना न देता आदिवासी विकास भवनसमोरील मुख्य रस्ता हा एका बाजूने वाहतुकीसाठी बंद झाला आहे. एकाच मार्गिकेतून दुतर्फा वाहतूक सुरु करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहने इतर मार्गांनी जात असल्याने त्या मार्गांवरही वाहने कोंडीत सापडत आहेत. आदिवासी विकास भवनसमोरील रस्ता हा सीबीएसकडे ये-जा करण्यासाठी वापरला जातो.
परंतु, रस्ता बंद असल्याने या रस्त्यावरील वाहतूक चांडक सर्कल, गडकरी चौक किंवा अन्य पर्यायी मार्गाने वळवली जात आहे. वाहनचालकांना त्यामुळे जवळचे अंतर कापण्यासाठी लांबचा फेरा करावा लागत आहे. या परिसरात आयकर कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालये आहेत.
दरम्यान, कोणीही आंदोलक आदिवासी विकास भवनात शिरु नये, यासाठी भवनाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांची संपूर्णपणे चौकशी करुनच त्यांना आत सोडण्यात येत आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एका आंदोलनकर्त्यांने सोमवारी अन्नत्याग करण्याचा इशारा देत प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.
आदिवासी विकास विभागासमोर सुरू असलेल्या आंदोलनामुळे एका बाजूकडील रस्ता पूर्णत: बंद झाला आहे. वनविभागाच्या कार्यालयासमोरील मार्गिकेवरुन सध्या दुतर्फा वाहतुक सुरू आहे. याचा परिणाम त्र्यंबक नाका चौफुली, गडकरी चौक, चांडक सर्कल यासह अन्य भागात वाहतूक कोंडीवर होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसही अन्य मार्गाने ये- जा करीत आहेत – चंद्रकांत खांडवी (पोलीस उपायुक्त- वाहतूक)