नाशिक – प्रयागराजनंतर २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, हजारो कोटींची कामे हाती घेतली जात आहे. या कामांची व्याप्ती जशी वाढत जाईल, तसे अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. कुंभमेळा कामांत ३० हून विभाग जोडले आहेत. या विभागांतील रिक्त जागा विहित पद्धतीनुसार भरण्याची सूचना करण्यात आली आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भातील आदेश सर्व विभागांना दिले आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी विविध विभागांकडून कामाचे नियोजन सुरू आहे. या कामात अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्या कामाशी संलग्न विभाग व यंत्रणांनी आपापल्या रिक्त जागा भरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना विनंती करावी. ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत रिक्त जागा भरण्याचे अधिकार आहेत, त्यांनी त्या विहित पद्धतीचे पालन करून भराव्यात, असे डॉ. गेडाम यांनी सूचित केले.
रिक्त जागा भरण्यासाठी कालापव्यय होणार असेल अथवा हे शक्य नसल्यास, आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ सक्षम नसल्याची खात्री झाल्यास त्याबाबतची माहिती, आवश्यक मनुष्यबळाची मागणी आणि कार्यालयीन प्रमुखाच्या अभिप्रायासह कुंभमेळा प्राधिकरणास सादर करावी असे सांगण्यात आले आहे.
प्राधिकरणास नाशिक विभागातील कोणत्याही शासकीय विभाग, अभिकरण, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, संवंधानिक मंडळ, महामंडळासह सर्व प्राधिकरणांकडील मनुष्यबळ पूर्णवेळ अथवा अर्धवेळ अधिग्रहीत करून त्यांचा वापर करण्याचे अधिकार आहेत. याच प्रकारे नाशिक विभागाबाहेरील मनुष्यबळ शासनाच्या पूर्वपरवानगीने वापरण्याचे अधिकार प्राधिकरण अध्यक्षांना आहेत. मनुष्यबळाची कमतरता भासल्यास यानुसार वेळीच प्रस्ताव सादर करावा. कुंभमेळ्याच्या कामात मनुष्यबळाची कमतरता हे विलंबाचे कारण ग्राह्य धरले जाणार नसल्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी दिले आहेत.
कुंभमेळा कामांच्या नियोजनासाठी प्राधिकरणाने रिक्त जागा भरण्याची सूचना केली आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर व ग्रामीण पोलीस, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, देवळाली कटक मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग (नाशिक व अहिल्यानगर), भारतीय राज्यमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महावितरण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य सेवा, नाशिक पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद), अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय असे ३० आणि या व्यतिरिक्त ज्या विभागांमार्फत कुंभमेळ्याची शी संबंधित कामे केली जातील, अशा सर्व विभागांंचा समावेश आहे.
प्राधिकरण उपरोक्त विभागातील मनुष्यबळ कुंभमेळा कामांसाठी वापरणार आहे. मनुष्यबळाअभावी या कामात अडथळे येऊ नये म्हणून रिक्त जागा भरण्याची सूचना करण्यात आली आहे.