नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र सरकार मिळून तब्बल २५ हजार ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने विकास कामांसाठी आतापर्यंत सात हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या बाबतची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. कुंभमेळ्यास आता २१ महिन्यांचा कालावधी राहिला आहे. यानिमित्त देश-विदेशातील लाखो भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, भाविकांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास कामे, पायाभूत सोयी सुविधांच्या कामांना चालना दिली जात आहे.
कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग व अन्य रस्ते, रेल्वे स्थानक, रामकाल पथ, ओझर विमानतळ विकास आदींसाठी ९४२४ कोटींच्या कामांचे नियोजन केले आहे. राज्य शासनाने रस्ते विकासासाठी दोन हजार २७० कोटी आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या पहिल्या टप्प्यातील विविध विकास कामांसाठी पाच हजार १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नाशिक महानगरपालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प, रस्ते, पूल, ओएफसी केबल, सीसी टीव्ही अग्निशमन आदी कामांसाठी तीन हजार १६ कोटी २० लाख, जलसंपदा विभागाला घाट बांधणे, बॅरेज, उपसा सिंचन योजनेसाठी ७५० कोटी ५४ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला मलनि:स्सारण प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १६५ कोटी ८८ लाख, वीज वितरण कंपनीला उपकेंद्र उभारणीसाठी ७३ कोटी ५० लाख, राज्य पुरातत्व विभागाला ४८ कोटी ७८ लाख, नाशिक येथे साधूग्रामच्या भू संपादनासाठी दीड हजार कोटी, असा निधी प्राप्त झाला आहे. या शिवाय राज्य सरकारकडून कुंभमेळ्याशी निगडित अन्य प्रकल्पासाठी आठ हजार २६३ कोटी १४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. २०१५ मधील नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी जवळपास अडीच हजार रुपयांचे निधी खर्च करण्यात आला होता. तेव्हा नाशिक महापालिकेने १०५२ कोटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ६६० कोटींच्या कामे केली होती. याचा विचार करता आगामी कुंभमेळ्यात दहा पट अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.
