नाशिक : बंकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यासह देशात ठिकठिकाणी विद्यालय, महाविद्यालय, शासकीय आस्थापनांमध्ये वंदे मातरमचे सामूहिक गायन केले जात असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील उर्दू शाळांनी वंदे मातरम् म्हणण्यास सपशेल नकार दिला आहे. याविषयी शिक्षण विभाग तसेच शिक्षणमंत्री भुसेही अंधारात आहे.
वंदे मातरम् गीत सामूहिकरित्या म्हटले जात आहे. राष्ट्रभक्तीचे बलस्थान असणारे हे गीत म्हणण्यास मालेगाव मधील उर्दू शाळांनी नकार दिला आहे. वंदे मातरम गीत म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी काही शाळांचे कामकाज दिवाळीची सुट्टी संपली तरी अजून सुरु झालेले नाही. काही शाळा सुरू असल्या तरी वंदे मातरमचे गायन होत नाही. याविषयी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारणा केली असता वंदे मातरम् या गीताचे महत्व त्यांनी मांडले. भारताच्या स्वातंत्र्यात वंदे मातरम गीताची मोलाची भूमिका राहिली. प्रत्येक भारतीयाने वंदे मातरम गायला पाहिजे. जाणीवपूर्वक कुणी याला वेगळे वळण देत असेल तर योग्य नाही. असे कृत्य करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव येते. मालेगावमध्ये कोणत्या उर्दू शाळांमध्ये वंदे मातरमचे गायन झाले नाही, त्याची माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही मालेगावमधील संबंधित प्रकारापासून अनभिज्ञ आहे. वंदे मातरमचे सामुहिक गायन शाळांमध्ये होत आहे. मालेगावमध्ये जर कुठल्या शाळेत असे होत नसेल तर सोमवारी याविषयी माहिती घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाचे अधिकारी प्रशांत डिग्रसकर यांनी सांगितले. दुसरीकडे, बोगस शिक्षक भरतीसंदर्भात गुन्हे दाखल झाले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, असे भुसे यांनी सांगितले.
