नाशिक : गणेशोत्सवात नाशिक शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही. प्रमुख रस्त्यांसह बहतांश रस्ते खड्डेमय झाले असून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे महानगरपालिकेला दुरुस्तीचे काम करता आलेले नाही. आता पावसाने उघडीप घेतल्यानंतर ही कामे विभागवार तत्काळ सुरू केली जातील. यासाठी आपल्याला दोन दिवस थांबावे लागले तरी चालेल, परंतु, नाशिकला शक्य तितक्या लवकर खड्डेमुक्त केले जाईल, असे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील काही गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. नंतर विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली. या काळात महाजन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सार्वजनिक गणेश मंडळ आणि महापालिकेच्या संयुक्त बैठकीत मिरवणूक मार्गासह प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. तथापि, अनंत चतुर्दशीपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. या संदर्भातील प्रश्नावर महाजन यांनी भाष्य केले. गणेश मंडळांच्या परवानगींचा विषय आपण महापालिकेशी चर्चा करून सोडविला. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे अपेक्षित होते. या संदर्भात माहिती घेतली असता सातत्याने पाऊस सुरू असल्याने ही कामे होऊ शकली नसल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे खड्ड्यात पाणी आहे. तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजवल्यास पावसाच्या पाण्यात ते साहित्य वाहून जाऊ शकते. त्यामुळे विसर्जनानंतर, पावसाने उघडीप घेताच सर्व विभागात रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची काम प्राधान्याने हाती घेतली जातील. या संदर्भातील निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश दिले गेले आहेत. या कामासाठी स्वत दोन दिवस थांबावे लागले तरी चालेल. नाशिकला खड्डेमुक्त केले जाईल, असे महाजन यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीत शहरातील खड्डेमय रस्ते हा विषय भाजपला त्रासदायक ठरू शकतो. या प्रश्नी विरोधकांनी सातत्याने आंदोलने करून मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांकडून खड्डेमय नाशिक हा प्रचाराचा मुद्दा बनू शकतो. हे लक्षात घेत भाजपने तो शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. खड्डे बुजविण्याच्या कामास गती देण्यासाठी मंत्र्यांना दोन दिवस थांबावे लागणार यातून ते अधोरेखीत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करणार…
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने साधू-महंत नाराज असल्याच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपले सगळ्यांशी बोलणे होत असून कुणीही नाराज नसल्याचा दावा केला. त्र्यंबकेश्वरमध्ये घाट बांधणी, कुंड तयार करणे ही कामे वेळेत पूर्ण होतील. सिंहस्थ कुंभमेळ्याला आपल्याला दीड वर्ष म्हणजे जवळपास १६, १७ महिन्यांचा कालावधी आहे. या काळात सर्व कामे पूर्ण होतील. कुठलेही काम अपूर्ण राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. पावसाने उघडीप दिल्यानंतर कुंभमेळ्याची कामे तातडीने सुरू केली जातील, असे महाजन यांनी स्पष्ट केले.