नाशिक – जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालये वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहत आहेत. कधी डाॅक्टर उपस्थित नसणे, कधी औषधेच नसणे, रुग्णांना बाहेरुन औषध आणण्यास सांगणे, अस्वच्छता असे प्रश्न उपस्थित होतात. चर्चेत राहणाऱ्या रुग्णालयांपैकी एक म्हणजे कळवण उपजिल्हा रुग्णालय. हे रुग्णालय समस्येच्या गर्तेत असून वैद्यकीय यंत्रणा रुग्णांना वेळेवर सेवा देत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पहात रुग्णांना तासनतास बसून रहावे लागते. यंत्रणेवर वरिष्ठाचा अंकुश नसल्याने मनमानी वाढली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजात १५ दिवसात सुधारणा न झाल्यासर टाळे ठोकण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी दिला आहे.

उपजिल्हा रुग्णालय संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून यासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले. आमदार पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधला.वेगवेगळ्या विभागाची पाहणी करतांना अस्वच्छता, दुर्गधीकडे त्यांनी लक्ष वेधत खडे बोल सुनावले. रुग्णालयात रिक्त पदामुळे, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. रुग्णांना खासगी आणि जिल्हा रुग्णालयात पाठविले जात असल्याच्या तक्रारीची दखल आमदार नितीन पवार यांनी घेतली.

या भेटीत आमदार पवार यांनी औषधसाठा आणि टंचाईबाबतची कारणे, उपाययोजना,, रुग्णालयातील आधुनिक सुविधाची पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना दिले जाणारे जेवण, खाटांवरील मळकट चादरींकडे लक्ष वेधले. रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा कमी पडू देऊ नका, ग्रामीण आणि आदिवासी रुग्णांची हेळसांड करु नका. उपजिल्हा रुग्णालयात कळवण तसेच शेजारील तालुक्यातील आदिवासी व गोर गरीब कुटुंबातील सर्वसामान्य जनता आरोग्य सेवेसाठी येतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी केल्या.

उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी तसेच औषधपुरवठ्याची कमतरता आहे.डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत असून बहुतांश वेळा रुग्णांना प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात पाठविले जात असल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या. अद्ययावत सुविधा असून देखील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात हलविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून रुग्णालय परिसरात अस्वच्छता, दुर्गधी पसरली आहे. कळवणचे उपजिल्हा रुग्णालय सध्या वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर सुरु असून तेच डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ रुग्णालयात उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. आमदार नितीन पवार यांनी उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजावर उघड नाराजी व्यक्त करत जिल्हा रुग्णालयातील डॉ चौधरी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील दवाखान्यांमध्ये संदर्भित करावे लागत असल्याची कबुली यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली. यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशी बागूल, रुग्ण कल्याण समिती सदस्य उमेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव आदी उपस्थित होते.