नाशिक – नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणाची चौकशी कोणीही थांबविलेली नाही. या प्रकारांची सत्यता बाहेर आली पाहिजे. या प्रकरणात आजी-माजी मंत्री किंवा कोणीही असो, त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत त्यामध्ये लक्ष घालत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, असे विखे पाटील यांनी सूचित केले.
राज्यातील ७२ उच्च आजी-माजी अधिकारी, राजकीय नेते आणि काही मंत्री यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर समाजमाध्यमांत यावर बरीच चर्चा रंगली होती. अधिकृतपणे तक्रार नसल्याने हनीट्रॅपच्या जाळ्यात कोण अडकले, त्यांची नावे उघड झालेली नाहीत. यामध्ये केवळ शासकीय अधिकारी, राजकीय नेतेच नव्हे तर, वैद्यकीय वा अन्य क्षेत्रातील कुणीतरी अडकल्याचे बोलले जाते. काहींना त्याची मोठी किंमत मोजावी लागल्याची चर्चा आहे.
या प्रकरणावर विधिमंडळ सभागृहात चर्चेवेळी हॉटेल काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित असल्याचा उल्लेख झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यात कुठेच हनीट्रॅप नसल्याचे स्पष्ट केले असतानाही या विषयाचे कवित्व रंगले. नंतर या प्रकरणात अडकलेले मान्यवर कोण, असे फलक शहरात लागले. या प्रकरणात प्रारंभी ठाण्यासह नाशिक शहरांचा उल्लेख झाला. नंतर जळगाव आणि अन्य शहरांची नावे जोडली गेली. एका सामाजिक कार्यकर्तीने तर, नाशिकमधील हे हॉटेल आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा संबंध काय, असा प्रश्नही उपस्थित केला.
या प्रकरणातील संशयित महिलेने हॉटेल मालकाशी हितसंबंध जोपासत अल्पावधीत मोठी प्रगती साधल्याची चर्चा झाली. हनीट्रॅप प्रकरणावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले. त्या प्रकरणाची चौकशी कुणीही थांबवली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सत्यता बाहेर येऊन एकमेकांविषयी संशय राहता कामा नये असे ते म्हणाले. अशाच प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या जावयाला अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे मात्र विखे-पाटील यांनी नाकारले. कोणताही नवीन प्रश्न आला तर, एखादा प्रश्न मागे राहत नाही. चौकशी सुरूच राहते.
हनीट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. माझा कोणावर संशय नाही आणि माझ्यावरही कोणाचा संशय नाही, असे त्यांनी नमूद केले. हनीट्रॅप प्रकरणात महसूल विभागाच्या बड्या अधिकाऱ्याला अडकवून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. यावरून परस्परविरोधी तक्रार दिल्या गेल्या आणि नंतर त्या मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते. हॉटेल मालकाचा जमीन खरेदी- विक्रीचा पूर्वापार व्यवसाय आहे. संबंधिताची जागेशी संबंधित अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत. महसूल विभागाच्या वरदहस्ताशिवाय ही कामे पुढे सरकत नाही. संशयिताच्या हॉटेलमध्ये ये-जा करणारे आणि वास्तव्य करणारे अधिकारी, मंत्री, राजकीय नेत्यांविषयी चर्चा घडत आहेत.