धुळे : येथील कुख्यात गुन्हेगार वैभव ऊर्फ रोहित ऊर्फ बेंड्या वाघमोडे यास संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) वर्षभरासाठी नाशिक कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी निवडणूक आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजविघातक कृत्य करणारे, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्यांसह सामाजिक स्तरावर धोकादायक ठरू शकणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांविरुध्द कारवाई सुरु केली आहे. अशीच एक कारवाई मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वैभव ऊर्फ रोहित ऊर्फ बेंड्या वाघमोडे (२२, रा. वाल्मिकी आंबेडकर वसाहत, दंडेवाले बाबा नगर, मोहाडी उपनगर,धुळे) या गुन्हेगाराविरुध्द करण्यात आली.

संशयित वाघमोडे हा दरोडा टाकणे, हत्येचा प्रयत्न करणे, जबरीचोरी करणे, विनयभंग करणे, पुरावा नष्ट करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा दाखविणे, चिथावणी देणे, यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत होता. मानवी शरीरास बाधा आणि आर्थिक नुकसान होईल, असे अपराध करण्याची त्याला सवय झाल्याने तो धोकादायक झाला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

या पार्श्वभूमीवर मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी सराईत गुन्हेगार वैभव वाघमोडे याच्याविरुध्द कारवाईचा फास आवळला. धुळे शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात कारवाईचा प्रस्ताव सादर केला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी या प्रस्तावाची छानणी करुन सर्व कायदेशीर तरतुदींची पडताळणी केली. वाघमोडे यास स्थानबध्द करण्याची शिफारस केली.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी वैभव ऊर्फ रोहित ऊर्फ बेंड्या वाघमोडे यास नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. मोहाडीनगर पोलीस ठाणे मार्फत सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर बेंड्याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.  कुख्यात गुन्हेगार वैभव  वाघमोडे उर्फ बेंड्याविरुध्द मागील पाच वर्षात धुळे शहरातील मोहाडीनगर पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नागरिकांनी भयमुक्त वातावरणात जीवन जगण्यासाठी, सण उत्सव साजरा करण्यासाठी व आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही गुन्हेगारांविरुद्ध अशीच कारवाई  करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ही कारवाई  पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, उपनिरीक्षक मोहन पाटील तसेच चेतन मुंडे, अंमलदार संतोष हिरे, कबीर शेख, हर्षल चौधरी व रमेश शिंदे यांनी केली.