धुळे : निवडणुका जवळ आल्या असताना पालक मंत्री जयकुमार रावल यांच्याच धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये जुने आणि निष्ठावान म्हणून घेणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष सत्तेच्या शिखरावर असतानाही कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली खदखद उफाळून आल्याने पक्ष नेते या नाराजी नाट्यावर कसा पडदा टाकतात याकडे स्वपक्षीयांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.
पक्षाच्या कठीण काळात निःस्वार्थपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आता उघडपणे मांडल्या आहेत. “सत्तेविरोधात आंदोलन करताना आमच्यावर १५ ते १६ गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही मागे फिरलो नाही. आज पक्ष सत्तेत आहे, पण आमचा विसर पडला,” अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.धुळे जिल्ह्यातील या कार्यकर्त्यांनी अलीकडेच घेतलेल्या छोटेखानी बैठकीत आपल्या भावना मांडल्या आणि त्या लेखी स्वरूपात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष घेणार अंपळकर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे.
संजय बोरसे, योगेश मुकुंद, अँड. अमित दुसाने, निलीमी व्होरा यांसह अनेकांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. भाजपाच्या पडत्या काळात पक्षासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांची आता स्वतंत्र संघटना बांधण्याचीही तयारी केल्याचे म्हटलेजाते आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पक्षाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्ष सत्तेत असताना जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. “नव्या लोकांचे प्रवेश स्वागतार्ह आहेत, परंतु त्यांना पक्षाची संस्कृती आणि कार्यपद्धती समजण्यासाठी किमान पाच ते दहा वर्षे संघटनात्मक काम देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विविध महामंडळे आणि समित्यांमध्ये स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचाही संदर्भ दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी विविध दौऱ्यांदरम्यान “जुने कार्यकर्ते आता भेटत नाहीत” अशी खंत व्यक्त केली असल्याची आठवण करून देण्यात आली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन योग्य तो सन्मान द्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही ३५ ते ४० वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने जोडलेले आहोत, हिंदुत्ववादी विचारधारेवर आमचा ठाम विश्वास आहे आणि सत्तेच्या काळात वा पडत्या काळात आम्ही कधीही पक्ष सोडण्याचा विचार केला नाही. अनेक प्रलोभने आणि आमिषे मिळूनही आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहिलो. त्यामुळे पक्षाने आमच्या योगदानाची दखल घेऊन आगामी निवडणुकांमध्ये प्रभागनिहाय संधी द्यावी.
या मागणीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
