नाशिक – रिपाइंचा पदाधिकारी प्रकाश लोंढे आणि टोळीवर कठोर कारवाईबरोबर त्याच्या अनधिकृत इमारतीवर बुलडोझर फिरविण्यात आल्यावर टोळीची नवीन कारस्थाने उघड होत आहेत. सातपूर भागात जमिनीवर काही्नी अतिक्रमण करीत कब्जा केला. या जमिनीची कुणालाही विक्री करू देणार नाही, अशी ग्राहकांमध्ये दहशत पसरवून लोंढे टोळीने जमीन मालकाकडे जमीन स्वरुपात खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे आणि भूषण लोंढेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर येथील हॉटेलमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य साथीदारांना ताब्यात घेतले होते. मुख्य सूत्रधार भूषण लोंढे अद्याप फरार आहे. गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर अंबड पाेलिसांनी एका गुन्ह्यात लोंढे पिता-पुत्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणात ते सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी घडल्या. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाईचा मार्ग अनुसरला. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे टोळीशी संबंधित अनधिकृत इमारत मागील आठवड्यात जमीनदोस्त करण्यात आली. पीएल ग्रुपचा दबदबा दर्शविणारे इमारतीसह आसपासचे फलक, कठडे हटविण्यात आले. आता या टोळीविरुद्ध खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

शाहू म्हस्के या वयोवृद्ध नागरिकाने दिलेल्या तक्रारीनुसार म्हस्के यांची सातपूर शिवारात सर्वे क्रमांक १८३-१ मध्ये २३ गुंठे जमीन आहे. ही जमीन बेकायदेशीरपणे हडपण्याचा संशयित दीपक लोंढे उर्फ नानाजी, प्रकाश लोंढे उर्फ बॉस आणि भूषण लोंढे उर्फ भाईजी (तिघेही स्वारबाबानर, सातपूर) यांनी गुन्हेगारी कट रचला. शोभा् म्हस्के, राहुल म्हस्के, शोभा म्हस्के यांची मुलगी, बेबाताई चव्हाण व यशवंत चव्हाण (सातपूर) यांच्याशी संगनमताने जमिनीवर अतिक्रमण करून राहण्यास चिथावणी देत कब्जा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराने जमीन विकण्याचा प्रयत्न केला असता संशयित दीपक लोंढे याने ती जमीन ते सांगतील त्या भावात आणि त्यांनाच विकण्याची धमकी देऊन कोणालाही जमीन खरेदी करू देणार नाही, अशी धमकी दिली. तक्रारदाराकडे जमीन स्वरुपात खंडणी मागितल्या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडूून देण्यात आली.