नाशिक – गणेशोत्सवानिमित्त पोलीस दल सतर्क असून उत्सव काळात होणारी गर्दी, या गर्दीचा फायदा घेत होणारी लुटमार, या पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण पोलिसांच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहर परिसरात एक हजारहून अधिक सार्वजनिक मंडळ आहेत. पोलीस दलाचा विचार केला तर परिमंडळ एकमध्ये ४४२ आणि परिमंडळ दोनमधून ४२५ अशा एकूण ८६७ मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. गणरायाच्या आगमनानंतर कोणी त्याला दीड दिवसात, कोणी पाच दिवसात तर कोणी दहा दिवसानंतर निरोप देतात. त्यावेळी होणारी गर्दी पाहता पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. यामध्ये तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर अविरत काम करणार आहेत.

उत्सवात पहिले काही दिवस परिमंडळ एक आणि दोन मधील चार उपायुक्त, पाच सहायक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ३७ परीवीक्षाधीन उपनिरीक्षक, दोन हजार २०० अंमलदार, ३०० महिला पोलीस अंमलदार, २५ लोहमार्ग मुंबई पोलीस अंमलदार, ११०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी, २५० महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, केंद्र व राज्य सरकारचे वेगवेगळ्या अशा तीन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उत्सव काळात पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

८०४ गावात एक गाव एक गणपती..

जिल्ह्यात निम्माहून अधिक गावात एक गाव एक गणपतीचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी गावपातळीवर केलेल्या प्रबोधनाने सामंजस्याने जिल्ह्यातील एक हजार ९३५ पैकी ८०४ गावांत एकत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. या संकल्पनेमुळे एकमेकांमधील तंटे निराकरणास मदत होत असून गावे एकमेकांना सहकार्य करीत आहेत. सार्वजनिक उत्सवाचे महत्त्व टिकून राहण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दोन हजारांपेक्षा जास्त मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि तेगबिरसिंग संधू यांनी गावपातळ्यांवर बैठका घेत एक गाव, एक गणपतीसाठी मंडळांना प्रोत्साहित केले. जिल्हाभरातील ४० पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले असून, सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.