जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बरेच गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी त्या प्रकरणात उडी घेतल्यापासून ते प्रकरण आणखी जास्त तापले आहे. दरम्यान, प्रफुल्ल लोढाच्या मुलाने वडिलांवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात खडसे आणि मोठ्या साहेबांचा हात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

संशयित प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार तसेच हनी ट्रॅपसंबंधी इतर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्या जळगाव जिल्ह्यातील संपत्तीची झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांनी झडतीत लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, भ्रमणध्वनी जप्त केले. लोढा प्रकरणामुळे जामनेर तालुका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वापर घनिष्ठ संबंध असल्याचे म्हटले आहे. तसेच लोढासोबत हनी ट्रॅपमध्ये मंत्री महाजन यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, प्रफुल्ल लोढा विरोधात मुंबईसह पुण्यात बलात्कारासह फसवणूक तसेच हनी ट्रॅपसंबंधी गुन्हे दाखल झाल्यानंतर लोढा कुटुंबियांकडून पहिल्यांदा प्रतिक्रिया देण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन लोढा याने म्हटल्यानुसार, त्याच्या वडिलांच्या विरोधात दाखल झालेले तिन्ही गुन्हे खोटे आहेत. हनी ट्रॅपचा आणि आमचा काहीच संबंध नाही. तसा काही प्रकार असता तर आज आम्ही नोटांमध्ये खेळलो असतो. पण आज आमच्याकडे काहीच नाही. हा फक्त प्रसिद्धीसाठी केलेला प्रकार आहे. आमच्या संपत्तीची कोणीही येऊन चौकशी करावी. ईडीने करावी किंवा एसआयटीने करावी. माझ्या वडिलांविरोधात षडयंत्र रचण्यात खडसे आणि मोठ्या साहेबांचा हात असल्याचे त्याने म्हटले. मोठे साहेब नेमके कोण, या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्याने टाळले.

सर्वात आधी आता मी एकनाथ खडसे यांची तक्रार करणार आहे. गौण खनिज प्रकरणी त्यांना जो कोट्यवधी रूपयांचा दंड ठोठावला होता, तो पुढे रद्द कसा झाला. त्याबद्दल मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे पवन लोढा याने सांगितले. मंत्री गिरीश महाजन आणि माझे वडील प्रफुल्ल लोढा यांच्यात काही वर्षांपूर्वी थोडे मतभेद झाले होते. मात्र, नंतर दोघांमधील मतभेद दूर देखील झाले. त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचे काम खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच केले होते, असाही आरोप पवन याने केला. खडसे यांच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाही. म्हणून ते प्रसिद्धीसाठी गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यावर आरोप करत असल्याचेही पवन लोढा म्हणाला.