जळगाव – दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतरही काँग्रेसचा राजीनामा देणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादीत (अजित पवार) हजारो आदिवासींसह प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष अजितदादांनी त्यांना आता मोठी जबाबदारी सोपवली आहे.

आदिवासींसह इतर वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रतिभा शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नेतृत्व गुण लक्षात घेऊन काँग्रेसने त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सोपवली होती. त्यानुसार, शिंदे यांनीही लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केवळ काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रचार केला. सभा गाजवून महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले.

शिंदे यांची पक्षाला असलेली गरज लक्षात घेऊन काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची यावेळी दुसऱ्यांदा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती त्यामुळे केली. प्रत्यक्षात, पक्षाकडून पुन्हा प्रदेश कार्यकारिणीवर संधी मिळून आठ दिवस उलटत नाही तितक्यात शिंदे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला.

प्रदेशाध्यक्षांकडे पाठवलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे कोणतेच कारण दिले नव्हते. मात्र, नंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसमधून बाहेर पडण्यास जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील सगळेच नेते आणि पदाधिकारी कारणीभूत असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या आशा घेऊन मी गेले होते, जे प्रश्न सोडविण्याची मला अपेक्षा होती, त्या संदर्भात आपल्याला तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसच्या बैठकीला न बोलविण्यापासून न बोलू देण्यापर्यंतचे राजकारण केले गेले. प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यावर आपण बाळासाहेब थोरात, नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे गेलो. तसेच वडेट्टीवारांना आणि चेन्नीथलांना भेटलो. मुकुल वासनिकांना तब्बल ३० वेळा फोन आणि संदेश पाठवले. शेवटी राहुल गांधींची भेट घेऊन आपल्याला काँग्रेसमध्ये काम करणे आता शक्य नाही, माझा आवाज दाबला जात आहे आणि मी आवाज दाबू देणाऱ्यांमधील नाही. जिथे काम करू दिले जात नाही तिथे मी राहू शकत नाही, असे सांगितल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले होते.

त्यानंतर प्रतिभा शिंदे यांनी ऑगस्टमध्ये जळगावात पार पडलेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत लोकसंघर्ष मोर्चाच्या त्यांच्या हजारो समर्थकांसह प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीत सक्रीय असलेल्या शिंदे यांची पक्षाध्यक्ष अजितदादांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पदावर वर्णी लावली आहे. पक्षाची ध्येय धोरणे, विचार, भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.