जळगाव : पुण्यातील खराडीत एका सोसायटीमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला होता. पोलिसांच्या कारवाईत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी पुणे रेव्ह पार्टी प्रकरणाच्या एकूण पोलीस तपासावर संशय व्यक्त करतानाच कोणी कितीही प्रयत्न केला तरी, सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

पुण्यातील पुणे रेव्ह पार्टी प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस यंत्रणा करत आहे. मात्र, त्यावर आमदार एकनाथ खडसे यांनी शंका व्यक्त केली आहे. या घटनेत सर्व काही पद्धतीशीरपणे घडवून आणले गेले असून, हे प्रकरण त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेला कट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कथित रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या दोन महिलांचा प्रांजल खेवलकर यांच्याशी काहीही संबंध नाही. त्या मुद्दाम तिथे उपस्थित करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या साऱ्या घडामोडींमागे मोठ्या व्यक्तींचा हात असावा, असा संशयही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. या व्यतिरिक्त खोटे बोल पण रेटून बोल, असे सगळे हे नाटक सुरू आहे. लवकरच या नाटकाचा पर्दा फाटणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, कोंबडं कितीही झाकलं तरी आरवल्या शिवाय राहत नाही. तसा या सर्व प्रकरणाचा खोटेपणा आता उघडकीस येऊ लागला आहे, असे विधान एकनाथ खडसे यांनी समाज माध्यमावर केले आहे. पोलीस आयुक्त म्हणतात आम्ही कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ माध्यम प्रतिनिधींना दिले नाहीत. मग ते माध्यमांपर्यंत गेले कसे ? पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे कारवाई रात्री तीन वाजता झाली तर कोण इतका अंतर्यामी आहे की ज्याला पोलीस या ठिकाणी कारवाई करणार असल्याचे कळले. आणि तो तिथे हजर होता. एका खासगी हॉटेलच्या रूममध्ये रात्री तीन वाजता कोण व्हिडीओ चित्रीत करण्यासाठी पोहोचणार ? एका प्रतिबंधीत क्षेत्रात एक सामान्य माणूस कसा पोहोचू शकतो ? बरे व्हिडीओ रूमच्या मध्य भागातून चित्रीत केला गेला आहे‌. जेणेकरून टिव्हीमध्ये सर्व काही स्पष्ट दिसेल. कोण उत्साही सर्वसामान्य माणूस इतक्या रात्री असा व्हिडिओ चित्रीत करू शकतो ? एखादी कारवाई करत असताना पोलिसांची ही टीप सामान्य माणसांपर्यंत पोहोचलीच कशी ? असे अनेक प्रश्न एकनाथ खडसे यांनी समाज माध्यमावर उपस्थित केले आहेत.