नाशिक: मध्य रेल्वेच्या वाशिंद व खडवली स्थानकांदरम्यान मुसळधार पाऊस, दरड कोसळणे, रेल्वे मार्गाखालील खडीचा भराव वाहून जाण्याच्या घटनांमुळे मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकात थांबविण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांची वाहतूक पुणे, दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. काही रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवून माघारी वळवण्यात आल्या. रेल्वेच्या भुसावळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहापूर विभागात पावसामुळे भूस्खलनाचा इशारा मिळाल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ विभागातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला. वाशिंद-खडवली रेल्वे स्थानकादरम्यान पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. काही ठिकाणी मातीचा भराव रेल्वे मार्गावर आला तर, कुठे रेल्वे मार्गाखालील खडीचा भराव वाहून गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. हेही वाचा : खड्डे, वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाला आठपेक्षा अधिक तास, महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सेवाग्राम एक्स्प्रेस देवळाली रेल्वे स्थानकावर थांबवून माघारी वळविली जाणार आहे. या रेल्वेतील प्रवाशांसाठी २० बसेसची व्यवस्था केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्स्प्रेसही इगतपुरी रेल्वे स्थानकावर खंडित करण्यात आली. रिकामी गाडी पुन्हा मनमाडला आणली जात आहे. रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल ११ रेल्वेगाड्या वळवल्या आहेत. हेही वाचा : नाशिक : सुरगाण्यात पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू, घाटमाथ्यावर पावसाची हजेरी भुसावळ विभागात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. मुंबईकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे. मनमाडहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात आली आहे आणि मुंबईकडून मनमाडच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पुणे, दौंडमार्गे वळविण्यात आल्या आहेत.