जळगाव : बुद्धिबळात दिव्या देशमुखच्या यशामुळे जग भारताच्या बुद्धिमत्तेला सलाम करत असताना महाराष्ट्राचीही शान वाढली आहे. खेळामध्ये देशाची विलक्षण प्रगती होत आहे. यापुढील काळात प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत खेळ पोहचवून ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान कसे उंचावेल, यासाठी केंद्राचे विशेष क्रीडा धोरण तयार केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी क्रीडा दिनी प्रोत्साहनपर विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथे दिली.
जळगावमधील जैन हिल्सवरील अनुभूती मंडपममध्ये स्वीग लीगमध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुले-मुलींच्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी शनिवारी केले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांमधील ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी खेळाचे महत्व विषद केले. त्यासोबत खेळास छंद म्हणून प्रोत्साहन देण्याकरीता केंद्र सरकार स्वतंत्र धोरण तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, कोलकता येथील आंतरराष्ट्रीय पंच देवाशीष बरूआ उपस्थित होते.
स्पर्धेच्या या युगात पाल्यांमध्ये ताण तणाव निर्माण होत असतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने खेळाचे महत्व वाढले आहे. मुलांनी खेळ छंद म्हणून जोपासावा. पालकांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मंत्री खडसे म्हणाल्या. आठ ऑगस्टपर्यंत स्वीग लीगमध्ये खेळविण्यात येणाऱ्या ११ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी केले. छत्रपती संभाजीनगरमधील पाच वर्षीय वल्लभ कुलकर्णी याच्यासोबत रक्षा खडसे यांनी बुद्धिबळ पटावर मोहराच्या चाली खेळल्यात. यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविकातून देशभरातून दाखल झालेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत केले. भारताचे बुद्धिबळामध्ये उत्तम भवितव्य आहे. दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी यांच्या यशामुळे या खेळामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पैकी दिव्या ही २०२२ मध्ये जळगावात पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती, याची आठवण जैन यांनी सांगितली. खासदार स्मिता वाघ यांनी २८ राज्यांतून जैन हिल्सच्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या पालकांसह आलेल्या खेळाडूंचे कौतूक केले. प्रत्येक जण काही तरी शिकून किंवा जिंकून जाणार आहे. त्यासोबत जळगावच्या आठवणी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.