जळगाव – लोकसभेसह विधानसभेत युती होते. मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये का होत नाही, असा उद्विग्न सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केला आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, असेही म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांचे सरकारमध्ये आता कोणीच ऐकत नाही, असा टोला आमदार रोहित पवार यांनी येथे हाणला.
जळगावमधील अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत सीआयएससीईच्या १७ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद-२०२५ स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधता आमदार पवार यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठ्या नेत्यांना ते सांगायचे आणि बऱ्यापैकी कामे होत असत. आता त्यांना विनवणी करावी लागत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष शंभर टक्के स्वतंत्रपणे लढणार आहेत. कारण, भाजपला स्वतंत्र लढून यावेळी लिटमस चाचणी घ्यायची आहे. आपण वेगळे लढलो तर काय होते, आपल्याला कुठे कुठे अडचणी येतात, याचा अंदाज घेऊन पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची रणनिती भाजप आखत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, असा दावा आमदार पवार यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. भाजप जवळ जो जातो, तो नंतर राजकीयदृष्ट्या संपतो, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. मंत्रालयात कोणत्या मोठ्या कंत्राटदाराला किती काम देता येईल, शक्तीपीठ महामार्गाला आणखी २० हजार कोटी कसे देता येतील, याची काळजी सरकारकडून घेतली जाते. इकडे मराठी मध्यमवर्गीय कंत्राटदार आत्महत्या करत आहेत. शेतकरी, मजूर आणि कष्टकरी अडचणीत सापडले आहेत. तरूणांना नोकऱ्या नाहीत. पिकांचे नैसर्गिक आपत्तीने मोठे नुकसान झाल्यानंतरही राज्याने कोणताच प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नाही, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, जीवनात कोणतेही मोठे कार्य एकट्याने करता येत नाही. त्यासाठी संघ सोबत हवा असतो. खेळातूनच ही सांघिकतेची प्रेरणा मिळते. खेळातील सांघिकता जीवनातही अंगिकारावी. शिक्षणासोबतच खेळातून देश हित जोपासावे, असा सल्ला पवार यांनी खेळाडूंना दिला. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन आणि माझे आजोबा मित्र होते. जैन यांनी संशोधनातून शेतीपूरक साहित्य पोहोचवून परिवर्तन घडविले. सूक्ष्म सिंचनातील जैन जगातील अग्र क्रमांकाची कंपनी बनली.
प्रत्येकासमोर आव्हाने येत असतात. मात्र, त्या आव्हानांतून मार्गही निघतो. जीवनात आलेल्या अडचणींवर खेळभावनेतून मात करता येते. ही सकारात्मक भावना ठेऊन प्रत्येक संघाने आपले सर्वोत्तम योगदान द्यावे, असेही आवाहन रोहित पवार यांनी केले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, निवड कमिटीचे सदस्य संजय पवार, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी होते.