जळगाव – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव गुरूवारी शहरात साजरा होत आहे. अर्धशतकाहून अधिक कालखंडापासून संघात जाणाऱ्यांपासून आताच्या पिढीतील तरूणांपर्यंतचे स्वयंसेवक त्यात सहभागी होणार आहेत. जनसंघाचे स्वयंसेवक ते जळगावचे नगराध्यक्ष, असा प्रवास करणारे ९१ वर्षीय परशुराम झारे हे त्यापैकीच एक आहेत.

विजयादशमीच्या दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्षातील विजयादशमीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गेल्या अनेक वर्षांपासून जुळलेल्या स्वयंसेवकांनाही मोठा मान प्राप्त झाला आहे. १९४७ मध्ये संघाशी संपर्कात आल्यानंतर आजतागायत स्वयंसेवक म्हणून जीवन जगलेले जळगावमधील परशुराम उर्फ मधू काशिनाथ झारे यांना संघाचे ते सुरूवातीचे दिवस आठवले.

स्वयंसेवक म्हणून संघाचे काम सुरू केल्यानंतर १९५२ मध्ये पहिल्यांदा गोरक्ष आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी गोवंशाच्या वधाला विरोध नोंदविण्यासाठी ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यासाठी माझ्याकडे दोन खेडी सोपविण्यात आली होती. त्यानंतर गुरूजींच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त १०० लोकांकडून प्रत्येकी एक रूपयांप्रमाणे वर्गणी गोळा केली. गुरूजी भुसावळमध्ये आल्यानंतर त्यांच्या भेटीचा योग सुद्धा आला. त्यावेळचे संघाचे जिल्हा प्रचारक तात्या बापट यांच्याबरोबर मी गेलो होतो. त्या दिवशी गुरूजींनी लोकांशी संपर्कात राहण्याचा आणि जातीभेद न करता इतर धर्मियांशी मैत्री करण्याचा सल्ला दिल्याचे परशुराम झारे यांनी सांगितले.

एम.एस.सी.साठी पुण्यातील एसपी महाविद्यालयात संघामुळे डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी मिळाली. मात्र, मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संघाच्या कामात झोकून देण्यासाठी जळगावला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. उदरनिर्वाहासाठी सुरूवातीला शिकवणी वर्ग घेतले. शहरात संघाच्या कामाला वेग दिल्यानंतर लोकांशी संपर्क वाढवला. १९६१ मध्ये जनसंघाला वाहुन घेतल्यावर संघटनमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आली. त्या माध्यमातून भडगाव आणि नशिराबादला नियमितपणे जाणे-येणे सुरू झाले. जनसंघाचे काम करताना जळगाव शहर व जिल्हा एकत्र काम करावे लागे. वैयक्तिक जनसंपर्क वाढल्यानंतर मात्र मी १९६७ मध्ये जनसंघाने उमेदवारी दिल्याने विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नशीब आजमावले. विजयी झाल्यानंतर १९६९ मध्ये नगराध्यक्ष बनण्याचा बहुमान देखील मिळाला. माझ्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता, असे परशुराम झारे म्हणाले.

जळगावच्या नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अनेक चांगले आणि महत्वाचे निर्णय घेतले. ज्यांची अंमलबजावणी आज देखील होताना दिसून येते. १९६७ मध्ये ठरवून दिलेला जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आजही तसाच कायम आहे, याचे समाधान वाटते. संघाचे काम करताना अनेक मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला. अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी अगदी संपर्क आला. त्यांना जळगावात आल्यावर पुष्कराज खड्याची अंगठी सप्रेम भेट दिली होती. पंडीत दिनदयाल उपाध्याय, गजाननराव जोशी हे तर आमच्या घरी येऊन गेले आहेत.

गुणवंतराव सरोदे यांच्यासाठी १९९१ मध्येही मी शहरप्रमुख सक्रीय होतो, असे सांगताना झारे आठवणीत रमले. आद्य सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांनी समस्त हिंदूंचे संघटन करण्याचे जे ध्येय समाजापुढे ठेवले होते, तेच हिंदू समाजाच्या आणि राष्ट्राच्या सर्व समस्यांवर तोडगा आहे. संघ कोणाचाही द्वेष करत नाही, असेही ते म्हणाले.